Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आले हरीचे विणट । वीर विठ्ठलाचे सुभट ॥
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: mn5
औदुंबर भिसे
5भंडीशेगाव, दि. 9 (प्रतिनिधी) :
कुंचे पताका झळकती ।
टाळ, मृदंग वाजती ॥
आनंदे प्रेम गर्जती ।
भद्र जाती विठ्ठलाचे ॥
भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्‍वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधू भेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात लाखो वैष्णवांसह संतांच्या पालखी सोहळ्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पंढरपूर तालुका प्रवेशानंतर संत ज्ञानदेवांचा व सोपानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. उद्या, दि.10 रोजी हे सर्व पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.
दुपारी 12 वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने माउलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन तोफांची सलामी दिली. येथे माउलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माउलींना तुषार सिंचनाद्वारे सुगंधी पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माउलींचे तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.
नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत गेल्या शेकडो वर्षापासून श्री. ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले-बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळ, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेवून येतात आणि वारकरी या शिदोरीचा आस्वाद घेतात.
दुपारी 2.30 वाजता ज्ञानराजांचा पालखी सोहळा टप्प्याकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळा पुढे काढण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडत होती. अखेर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सायंकाळी 5.30 वाजता माउलींचा पालखी सोहळा टप्प्याजवळ पोहोचला. त्यानंतर 5.45 वाजता सोपानदेवांचा पालखी सोहळा टप्पा येथे पोहोचला. येथे सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सोपानदेवांचे सोहळाप्रमुख श्रीकांत महाराज गोसावी यांना श्रीफळ भेट दिले. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, असा जयघोष झाला आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात बंधू भेटीचा सोहळा येथे रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे आगमन होताच यावेळी पंढरपूर तालुक्याच्यावतीने आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, आडत व्यापारी बाबासाहेब देशमुख, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह पंढरपूर तालुकावासीयांनी सोहळ्याचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे सायंकाळी 6 वाजता मुक्कामी पोहोचला. रात्री 8 वाजता संत सोपानदेव तर  9 वाजता संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी पोहोचला. उद्या, दि.10 रोजी संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. बाजीराव विहीर येथे दुपारी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: