Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘क’र्नाटकचा मुद्दा पुढे करत काँग्रेस खासदारांचा लोकसभेत गोंधळ
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: na1
5बंगळुरू, दि. 9 (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा मुद्दा पुढे करत काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. तसेच भाजपवर आरोप करुन सभात्यागही केला. भाजपनेच कर्नाटकमध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण केली आहे. संधी मिळताच शिकार करायची ही भाजपची वृत्ती आहे. या वृत्तीला आळा बसला पाहिजे, अशी मागणी लोकसभेत काँग्रेस नेते  अधीर रंजन चौधरी यांनी केली.
भाजपला असे वाटते, की देशात आपली सत्ता आहे तेव्हा सगळ्या राज्यांमध्येही आपलीच सत्ता असावी. त्यामुळे भाजपकडून राजकीय फोडाफोडी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याच मुद्द्यावरून गोंधळ घालत काँग्रेसने सभात्याग केला.
कर्नाटकमधल्या 11 आमदारांनी शनिवारी राजीनामा देऊन तिथले सरकार अस्थिर केल्यानंतर सोमवारी या बंडखोर आमदारांना सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसकडून चुचकारण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले अपक्ष आमदार आणि मंत्री नागेश यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या सत्तेत असलेल्या 21 मंत्र्यांनीही राजीनामा दिला. दरम्यान, या सगळ्या अस्थिरतेमागे भाजप असल्याचा आरोप सोमवारीही करण्यात आला होता. तसाच तो आजही करण्यात आला. लोकसभेतून बाहेर आलेल्या काँग्रेस खासदारांनी भाजप विरोधात घोषणाबाजीही केली. तर बंगळुरुमध्ये विधानसभेबाहेर काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन करत भाजपचा निषेध नोंदवला.
कर्नाटकमध्ये शनिवारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. मंगळवारी या सगळ्याचे पडसाद लोकसभेतही पहावयास मिळाले. दरम्यान, भाजपने फोडाफोडीचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसचे हे घरातले भांडण आहे आणि ते आमच्या डोक्यावर खापर फोडत आहेत, असे उत्तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या सगळ्यावर लोकसभेत दिले आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भाजपच फोडाफोडीमागे असल्याचा आरोप केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: