Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोवई नाक्यावरील चर्चबाहेर रस्त्याकडेला 1 टन कचरा टाकला
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : पोवई नाक्यावर असणार्‍या चर्चबाहेर रस्त्याकडेला परिसरातील प्रतिष्ठित व्यापार्‍यांनी काल रात्री तब्बल 1 टन कचरा टाकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चर्चच्या विश्‍वस्तांनी ही बाब पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आंबेकर यांनी संबंधित व्यापार्‍यांना कचरा उचलण्यास भाग पाडले. यापुढे पुन्हा कचरा टाकल्यास व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की काल रात्री येथील चर्च बाहेर रस्त्याकडेला परिसरातील काही प्रतिष्ठित व्यापार्‍यांनी जेंट्स वेअर, लेडिज वेअर, पंख्याचे मोकळे बॉक्स, थर्माकोल आदी साहित्य असलेला सुमारे एक टन कचरा टाकला होता. आज सकाळी चर्चच्या विश्‍वस्तांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना सांगितली. श्रीकांत आंबेकर यांनी घटनास्थळी जाऊन हा कचरा कोणी टाकला याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही व्यापार्‍याने तोंड उघडले नाही. तोपर्यंत रस्त्याकडेला कचरा टाकल्याने नागरिकांमध्ये संतप्त पडसाद उमटले होते. नागरिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच श्रीकांत आंबेकर यांनी तो कचरा बाजूला करून त्यातील बॉक्सचा शोध घेतला असता त्यामध्ये दोन प्रतिष्ठित कापड व्यापारी आणि एक इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या नावांचे काही बॉक्स आढळून आले. आंबेकर यांनी ही बाब पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या कानावर घातली. शंकर गोरे यांनी गणेश टोपे आणि यादव या दोन आरोग्य अधिकार्‍यांना घटनास्थळी पाचारण करून संबंधित प्रतिष्ठित व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आंबेकर यांच्या प्रयत्ना-मुळे प्रतिष्ठित व्यापार्‍यांची नावे पुढे आल्यानंतर त्या व्यापार्‍यांनी टाकलेला कचरा स्वतः उचलतो, मात्र कारवाई न करण्याचा लकडा आंबेकर यांच्याकडे लावला. आंबेकर यांनी समजूतदारपणा दाखवून त्या व्यापार्‍यांचे चांगलेच कान उपटले. खा. श्री. उदयनराजे भोसले हे मतदारसंघासह सातारा शहराचा झपाट्याने विकास करत असताना विकासकामांमध्ये अशा प्रकारचे अडथळे सहन केले जाणार नाहीत. विकासकामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी आम्हाला दिल्या आहेत. यापुढे रस्त्यावर कचरा टाकल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात त्यांनी त्या व्यापार्‍यांना  खडसावले. दरम्यान त्यातील एका व्यापार्‍याने रात्र झाल्यानंतर उरलेला कचरा उचलून तो कचरा टाकतो, असे सांगितले असता तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर अंमलबजावणी न झाल्यास उद्या सकाळी तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगून आंबेकर यांनी त्या व्यापार्‍याला रात्री कचरा उचलण्याची मुभा दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: