Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संतांच्या पालखींचा आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re2
5वेळापूर, दि. 8 :
आता कोठे धावे मन ।
तुमचे चरण देखलिया ॥
भाग गेला, शीण गेला ।
अवघा झाला आनंद ॥
अध्यात्मिक साधनेचे प्रतीक असलेले रिंगण, आत्म्याची परमात्म्याविषयी ओढ निर्माण करणारा धावा आणि लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे भारूड, असा त्रिवेणी संगम असणार्‍या भक्तिद्वारे भागवत धर्माची पताका उंचावत निघालेला वैष्णवांचा मेळा आज जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक वेळापूर नगरीत विसावला. उद्या, दि.9 रोजी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवा येथे झाल्यानंतर टप्पा येथील बंधूभेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.
वेळापूर ही एक पुरातन एकचक्रीनगर आहे. पांडवांच्या अज्ञातवासात भीम-बकासुराचे युद्ध येथेच झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. बकासूर वधाने वेळ टळली म्हणून या गावाचे नाव वेळापूर पडले, असे सांगितले जाते. येथे हेमाडपंथी श्री अर्धनारी नटेश्‍वराचे मंदिर आहे. हे एक जागतिक लेणे असल्याने व शिव-पार्वतीची सुंदर अलंकार घातलेली मूर्ती असल्याने देशभरातून येथे हजारो पर्यटक येतात.
माळशिरस तालुक्यात खोदकाम करताना सापडलेल्या सुंदर मूर्ती येथे आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मूर्ती संग्रहालय येथे बांधले आहे. डॉ. भाईनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. येथील श्रीधर कुटीमध्ये त्यांची समाधी आहे. महाराष्ट्रातून हजारो साधक शिव-पार्वती व भाईनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.
दरम्यान, सकाळी 6.30 वाजता माळशिरसहून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुसर्‍या गोल रिंगणासाठी सकाळी 9 वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरूवात झाली. सकाळी 9.30 वाजता माउलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. पुरंदावडे येथील नेत्रदीपक दौडीनंतर अश्‍वांनी आजही खुडूस येथे नेत्रदीपक दौड करुन लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही नेत्रदीपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माउलीऽ माउलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा संपला. त्यानंतर वारकर्‍यांनी पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला.
खुडूस ग्रामस्थांचे भक्तिपूर्ण स्वागत स्वीकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा निमगाव मगराचे (पाटी) येथे दुपारी 12 वाजता पोहोचला. निमगाव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतीच्यावतीने येथे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील हजारो भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकर्‍यांनी येथे दुपारचे भोजन व विश्रांती घेतली. शंकरराव मोहिते सूतगिरणीच्यावतीने हजारो वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. त्यानंतर हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. वाटचालीत शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, पिसेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वेळापूर येथे प. पू. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस उर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्वीकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. इकोबोर्ड येथे वेळापूरच्या सरपंच सौ. विमल जानकर, जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाईंजे, पंचायत समितीच्या सदस्या रेणुका माने-देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीशराव माने-देशमुख, वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांनी सोहळ्याचे स्वागत करून माउलींचे दर्शन घेतले. श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले, अशी आख्यायिका आहे. वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करतात. सायंकाळी 4.30 वाजता चोपदारांनी अश्‍वानंतर एक एक दिंडी सोडण्यास प्रारंभ केला.
तुका म्हणे धावा  आहे पंढरी विसावा
असे म्हणत वारकरी टाळ, मृदुंगाच्या गजरात व माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात अबालवृद्ध वैष्णव धावत सुटले. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह जाणवत होता.
एकनाथ महाराजांनी भारूडातून अंधश्रद्धाळू समाजावर कोरडे ओढले आहेत. भारूडातील रूपके, पात्र, नाट्यात्मकता, भारूडाची भाषा, भारूडातील अध्यात्म अशा कितीतरी दृष्टीने नाथांच्या भारूडांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आळंदी-पंढरपूर या पायी वारीत वेळापूर येथे ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसमोर जयसिंग मोरे यांच्या रथापुढील शेडगे दिंडी नं.3 च्यावतीने बावडा, ता. इंदापूर येथील लक्ष्मण राजगुरू व पिसेवाडी, ता. माळशिरस येथील महादेव शेंडे यांनी भारूडाची सेवा केली. न्हावी, गवळण व वेडी आदि रूपातून भारूडकरांनी भारूडे सादर केली. भारूडानंतर सायंकाळी 5.30 वाजता हा सोहळा वेळापूर मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 6.15 वाजता हा सोहळा ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळावर पोहोचला. समाजआरतीनंतर सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला. उद्या, दि. 9 रोजी सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेवून संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: