Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जवळवाडी येथे अपघातात नववधूचा दुर्दैवी अंत
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: re1
5मेढा, दि. 8 : मोरावळे, ता. मेढा येथील विवाहितेचा ट्रक खाली सापडून करूण अंत झाला. ही हदयद्रावक घटना मेढा-जवळवाडी गावाच्या हद्दीत आज दुपारी सव्वा बारा वाजता घडली.
याबाबत घटना स्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की रिटकवली गावचे माजी उपसरपंच व भाजपचे कार्यकर्ते सर्जेराव दादू मर्ढेकर (रा. रिटकवली) हे त्यांची नवविवाहित मुलगी सौ. भाग्यश्री गणेश जाधव (रा. मोरावळे) हिला हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एम. एच् 11 बीसी-2528) वरून मेढा येथून आठवडा बाजार घेवून रिटकवलीकडे येत होते. दरम्यान, मेढा-जवळवाडी येथील विजय सरडे यांच्या घरासमोर पाठीमागून येणार्‍या ट्रक (क्र. एम. एच. 42 बी 8508) ने दुचाकीला धडक दिल्याने सौ. भाग्यश्री ही रस्त्यावरच पडली. यावेळी वेगात असणार्‍या ट्रकखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक कासम उस्मान मुलाणी (रा. बुध, ता. खटाव, जि. सातारा) हा घटना घडल्यानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सर्जेराव मर्ढेकरही जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेचा तपास हवालदार संजय तडाखे करत आहे.
अर्ध्यावरती
डाव मोडला...
दरम्यान, सौ. भाग्यश्री हिचा विवाह 21 मे रोजी रिटकवली गावापासून 3 ते 4 कि.मी. अंतरावर असणार्‍या मोरावळे गावातील गणेश जाधव याच्याशी झाला होता. सध्या आखाड महिना सुरू असल्याने आखाड पाळण्यासाठी ती माहेरी आली होती. मात्र नियतीने डाव साधला. या अनपेक्षित घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पंढरपूर, रहिमतपूर, सातारा, मेढा, महाबळेश्‍वर ते पोलादपूर, असे रस्त्याच्या रुंंदीकरणाचे काम मंजूर आहे. त्यापैकी सातारा -मेढा मार्गावर रोडवेज सोलुशन कार्पोरेशन कंपनीच्यावतीने काम सुरू करण्यात आले आहे. मेन रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे दोन ते तीन फूट खोल खुदाई केल्याने  वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. सदरच्या कंपनीचे काम धिम्या गतीने  सुरू आहे. तरीही संबंधित खात्याचे अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत. अशा प्रकारे अपघाताची मालिका सुरू होण्यापूर्वी संबंधित खात्याने काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा तसेच ठेकेदार व अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनता व वाहन धारकांमधून होत आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: