Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तेजस्वी सातपुते यांनी केली ठोसेघर धबधबा परिसराची पाहणी
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo3
छोटा धबधबा नजीक उपाययोजना करण्याच्या सूचना
5सातारा, दि. 8 : पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी प्रथमच ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा परिसराची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर वन विभागाच्या कामाचे कौतुक करून छोटा धबधबा पडतो त्या ठिकाणी पाण्यातून दगड खाली येण्याची अथवा त्या ठिकाणी दरड पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या ठिकाणी वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी केली.
रविवार, दि. 7 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ठोसेघर धबधबा परिसराची पाहणी केली. प्रथम मोठ्या धबधब्याची पाहणी केली. या परिसरामध्ये ज्या - ज्या ठिकाणी संभाव्य धोके निदर्शनास आले, त्याचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या. संभाव्य धोक्यांचा अहवाल तयार करून तो वन विभागाला पाठवावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. छोटा धबधबा येथे पाहणी केली असता छोटा धबधबा कोसळतो तेथून पाण्यासोबत दगड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथे दरड पडण्याची भीती व्यक्त करून त्या ठिकाणी वन विभागाने उपाय योजना कराव्यात अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी ठोसेघर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्यालयात जाऊन तेथील कामकाज कसे चालते, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण यांच्याकडून घेतली. ठोसेघर धबधबा परिसरा-मध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले.
रविवारी 3 हजार पर्यटकांची भेट
मुसळधार पाऊस असतानाही रविवारी 3 हजार पर्यटकांनी ठोसेघर येथील धबधब्याला भेट दिली. गत रविवारी धबधबा परिसरात असणार्‍या रस्त्यावर मद्यप्राशन करून काही युवकांनी धुडगूस घातला होता.
त्याबाबतचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी पोलिसांनी ठोसेघरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामध्ये पीसीआर व्हॅनसह निर्भया पथक त्यामध्ये सहभागी झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: