Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील अर्थसंकल्प दि. 5 जुलै रोजी मांडला जाणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यावेळी 2019-20 साठी देशाचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजप सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. आधीच्या काळात संरक्षणमंत्री असणार्‍या निर्मला सीतारमन यांच्यावर यावेळी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी संसदेत त्या अर्थसंकल्प सादर करतील.
निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडताना वित्तीय तूट 6.4 वरून 5.8 आली असल्याची माहिती दिली तसेच 2019-20 मध्ये इंधन दर घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2019-20 साठी देशाचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) आर्थिक विकास दर 6.8 टक्के होता. आर्थिक पाहणी अहवालात    गुंतवणूक आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रात गती येईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार उल्लेख होणार्‍या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर आठ टक्के असणे गरजेचे आहे. हा विकास दर कायम राहिल्यास आपण सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ठरत चीनलाही मागे टाकू शकतो.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: