Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बँकेची परीक्षा आता तेरा प्रादेशिक भाषांमध्ये
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: mn3
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : बँक भरतीची परीक्षा देणार्‍या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणार्‍या विभागीय ग्रामीण बँकांच्या परीक्षा आता मराठीतही होणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे बँकेत अधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे. मराठीसह इतर 13 प्रादेशिक भाषांमधूनही या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता, मराठीसह उर्दू, तेलुगू, तमिळ, पंजाबी, ओडिया, मणिपुरी, मल्याळम, कोकणी, कन्नड, गुजराती, बंगाली आणि आसामी या भाषांमधून विभागीय ग्रामीण बँकांच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेतील अडथळे कमी होऊन स्थानिक तरुणांना बँकांमध्ये रोज-गाराची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सांगितले.    
काँग्रेसचे खासदार जी. सी. चंद्रशेखर यांनी बँकेच्या परीक्षा स्थानिक भाषेतून घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी लोकसभेत केली होती. आपल्या मातृभाषेत कन्नडमध्ये त्यांनी ही मागणी केली होती. याची दखल केंद्र सरकारने घेत आज ही घोषणा केली. बँकांच्या परीक्षा या स्पर्धा परीक्षेच्या स्वरुपात असतात. त्यामुळे त्या केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेतून होत असल्याने स्थानिक उमेदवारांना या भाषांमुळे परीक्षेतील प्रश्‍न समजून घेताना आणि त्याची उत्तरे लिहिताना अडचणी येत होत्या. परिणामी त्यांना संधीला मुकावे लागत होते. त्यामुळे बँकांच्या परीक्षा या स्थानिक भाषेत घेतल्या जाव्यात, अशी मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. त्याचा विचार करता केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: