Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेरच्या सामन्यात विंडीजची अफगाणिस्तानवर मात
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: sp1
5हेडिंग्ले, लीड्स, दि. 4 (वृत्तसंस्था) : आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत  वेस्ट इंडिजने विश्‍वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला आहे. 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 50 षटकात 288 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने 86 तर रेहमत शाहने 62 धावांची खेळी करत एकतर्फी झुंज दिली. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने 4, केमार रोचने 3 तर ख्रिस गेल आणि थॉमसने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. अफगाणिस्तानचा एक फलंदाज धावबाद झाला.
अखेरच्या सामन्यातही अफगाणि-स्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार गुलबदीन नैब स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर रेहमत शाह आणि इक्रम अलीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावल्यानंतर, विंडीजच्या गोलंदाजांचा ताप वाढवणार, असे वाटत असतानाच रेहमत शाह ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर नजीबउल्ला झरदान आणि असगर अफगाण यांनी फटकेबाजी करत धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्नही तोकडेच पडले. दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाला गळती लागली.
त्यापूर्वी, आपला अखेरचा सामना खेळणार्‍या वेस्ट इंडिजने 311 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल माघारी परतल्यानंतर नंतरच्या सर्व फलंदाजांनी अफगाणी गोलंदाजांचा समाचार घेतला. एविन लुईस, शाई होप आणि निकोलस पूरन यांनी वेस्ट इंडिजकडून अर्धशतकं झळकावली.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या विंडीजची सुरुवात खराब झाली. दौलत झरदानने ख्रिस गेलला 7 धावांवर माघारी धाडलं. यानंतर विंडीजच्या सर्व फलंदाजांनी खेळपट्टीवर तग धरत मोठी धावसंख्या उभारली. एविन लुईस, शाई होप, शेमरॉन हेटमायर, निकोसल पूरन आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी फटकेबाजी करत विंडीजला 311 धावांचा टप्पा गाठून दिला.
शाई होपने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून दौलत झरदानने 2 तर सय्यद शिरझाद, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. विंडीजचा एक खेळाडू धावबाद झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: