Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टेम्पोच्या धडकेत बुलेटवरील दोघे ठार
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 11 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत टेम्पोने कारसह बुलेटला दिलेल्या धडकेत बुलेटवरील इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 24, रा. वडगाव हवेली, ता. कराड) व सुरेश भोला पासवान (वय 25, सध्या रा. गोटे, ता. कराड, मूळ राहणार बिहार) हे युवक ठार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, कराड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेठ नाका (जि. सांगली) येथील काम आटोपून इर्शाद व सुरेश हे बुलेटवरून कराडकडे येत होते. पुणे-बंगलोर महामार्गावर मालखेड गावच्या हद्दीत हॉटेल वरदसमोर भरधाव टेम्पोने कार व बुलेटला पाठीमागून धडक दिली. या धडकेत बुलेटवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसर्‍याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच  
 महामार्ग विभागाचे पोलीस, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक त्यांनी पूर्ववत केली. जखमींना मदत करून घटनेचा पंचनामा केला. अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: