Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुळाच्या ओढ्याचा फास आवळला
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: lo2
अतिक्रमणधारक मोकाट; पालकमंत्र्यांची बोलाचीच कढी, बोलाचाच भात
शशिकांत कणसे
5सातारा, दि. 11 : अजिंक्यतारा किल्ला परिसरात उगम पावलेल्या प्रसिद्ध सुळाच्या ओढ्याचा फास आवळण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून प्रशासन त्यावर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने या ओढ्यावरील अतिक्रमणधारक मोकाट सुटले आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी नियोजन भवनातील बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणार्‍या सुळाच्या ओढ्याची पाहणी करून ओढ्यावरील अतिक्रमणे काढण्याची ग्वाही दिली होती. त्यांची ग्वाही म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरली असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाईदेवी मंदिरानजीक सुळाचा ओढ्या व काळंबी ओढा असे दोन आहेत. हे ओढे विलासपूर मार्गे कृष्णा नदीला जाऊन मिळतात. नकाशातही या दोन ओढ्यांचे अस्तित्व आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी शाहूनगर परिसरामध्ये सुळाच्या ओढ्यावर अतिक्रमणांचे मोठे पेव फुटले. काही ठिकाणी तर अक्षरशः ओढ्याचे अस्तित्व नष्ट करत मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंट बांधण्यात आल्याने ओढ्याने आपला मार्ग बदलला. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शाहूनगर येथे घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. अतिक्रमणांची फक्त ओरड होऊ लागली. मात्र अतिक्रमणे काढण्याची हिम्मत प्रशासनातील त्या-त्या वेळी असणार्‍या अधिकार्‍यांनी न दाखवल्यामुळे फुकटचंबू बाबूराव यांच्या धाडसात वाढ होऊ लागली. 
परिणामी सुळाच्या ओढ्याचे अस्तित्व पूर्णपणे नामशेष झाले. चार वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोडोली परिसरात असणारी पोलीस वसाहत ते महादेव मंदिर परिसर जलमय झाला होता. विविध दुकाने, हॉटेल्स व घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र अशी परिस्थिती का निर्माण झाली? या परिस्थितीला कारणीभूत ठरणार्‍या कोणत्याही घटकावर प्रशासनाने कारवाई का केली नाही? उलट गोडोली नाका येथे ओढ्याचे पात्र चार फुटी पाइपलाइन- मध्ये घालून त्या ओढ्यावर मानवी अतिक्रमण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असणार्‍या सुळाच्या ओढ्यात एका मोठ्या राजकीय व्यक्तीने आपली ताकद वापरून मोठी इमारत बांधली आहे. विविध अतिक्रमणांमुळे काळोखे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असणार्‍या सुळाच्या ओढ्याचे अस्तित्व कोठेही दिसून येत नाही. गेल्या दहा वर्षात बदलून आलेल्या अनेक तहसीलदारांनी अतिक्रमणांची पाहणी केली, मात्र अतिक्रमणे हटवण्याचे धाडस दाखवले नाही.
शाहूनगर हा भाग त्रिशंकूमध्ये येतो. या परिसराला कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. अशीच परिस्थिती गोळीबार मैदान परिसरात आहे. या ठिकाणी ओढ्याचे रूपांतर ओघळीमध्ये करून कचरा टाकला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात आलेल्या पावसाच्या पाण्याने हा कचरा नागरिकांच्या घरांमध्ये जात असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वर्षापूर्वी सुळाच्या ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्‍न, पावसाळ्यामध्ये शाहूनगरमध्ये निर्माण होणारी परिस्थिती याकडे पालकमंत्री विजय शिवतारे यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी पत्रकारांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणार्‍या सुळाच्या ओढ्याची पाहणी करून ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील ती हटविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या जातील, असे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले होते. अद्याप तरी सुळाच्या ओढ्यावरील अतिक्रमणांची एक वीटही काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले नसल्यामुळे सुळाच्या ओढ्याचा फास आणखीनच आवळत चालला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: