Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आ. अजित पवार यांना जरंडेश्‍वर कारखान्यातून हाकलून काढणार : डॉ. शालिनीताई पाटील
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
मतदारसंघात ढाबा संस्कृती रुजविणार्‍या जावलीकरांना परत पाठविणार
5कोरेगाव, दि. 11 : जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी ही सामान्य शेतकर्‍यांच्या कष्टातून झाली आहे. कारखाना मोडून खाणार्‍या आ. अजित पवार यांना कारखान्यातून हाकलून काढणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ढाबा संस्कृती रुजविणार्‍या जावलीकरांना आता परत पाठविण्याची वेळ आली आहे. ते काम सुद्धा करणार आहे, असा निर्धार माजी मंत्री डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला.
सक्रिय राजकारणाला 60 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांनी कोरेगावात  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अ‍ॅड. वसंतराव फाळके,  अविनाश फाळके, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, कार्यकारी संचालक किसन घाडगे, दरेचे सरपंच आनंदा जाधव, अभिजित फाळके, पोपटराव जगदाळे, रणजित फाळके उपस्थित होते. आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत त्यांनी राजकारणात करावा लागलेला संघर्ष, स्त्री असल्याने अनेक ठिकाणी करावी लागलेली राजकीय तडजोड आणि अनेक ठिकाणी घ्यावी लागलेली माघार  आदींचा त्यांनी ऊहापोह केला.
कारखाना हा जीवनातील महत्त्वाचा घटक
 जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाल्यास कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या विकासाला चालना मिळून  तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. कायम दुष्काळी असा शिक्का देखील पुसला जाईल या हेतूने खासदार असतानाच कारखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या जाचक अटी शिथिल करण्यास भाग पाडले आणि काही गोष्टींसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच जरंडेश्‍वर कारखान्याची उभारणी शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    
आ. अजित पवारांनी कारखाना गिळला
राज्यात सर्वाधिक म्हणजे दहा कोटी रुपयांचे भागभांडवल उभे करून आम्ही एकप्रकारे विक्रम केला. राज्य बँकेसह अन्य बँकांनी एकत्रित येऊन 24 कोटी रुपयांचे कर्ज दिले. विष्णू अण्णा पाटील यांनी या विषयात मदत केली. त्यानंतर कारखाना चांगला चालला होता. एकदा मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला अजित पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले.   कार्यक्रम झाला. कारखान्यावरील चेअरमन बंगल्यावर जेवण करत असताना कारखाना साईट चांगली आहे, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस त्यांच्या डोक्यात काय चालले आहे, याची कल्पना आली नाही. त्यांनी त्या दिवशीच कारखाना मोडीत काढून स्वत:कडे घ्यायचा, असे ठरविले हे आम्हाला लक्षात आले नाही. त्यामुळे आमचा घात झाला. त्यांचा डाव वेळीच आमच्या लक्षात आला नाही. त्यांनी एनकेन प्रकारे कारखाना गिळला असून आम्ही विविध मार्गांनी न्यायालयात दाद मागत आहोत. आता मुंबईच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू असून, 29 जून ही तारीख नेमण्यात आली आहे. कारखान्यासाठी दोन अधिकारी काम पाहात असून, त्यांच्या पगारासह न्यायालयाचे कामकाज करण्यासाठी मीच आर्थिक तरतूद करत आहे. या लढ्यात आम्हीच यशस्वी होणार असून, न्यायालयाच्या माध्यमातून हा कारखाना परत एकदा ताब्यात घेणार आहे.
फलटण-बारामतीला हक्काचे पाणी जाऊ देणार नाही
कोरेगावात दहा वर्षे आमदार म्हणून मिरवत असलेल्यांनी देखील आ. पवार यांनाच साथ दिली.  कारखान्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहात आहेत. कारखाना आणि शेतकर्‍यांच्या विषयावर ते काहीच बोलत नाहीत. गेल्या वर्षी कारखान्याने जाहीर केलेला उसाचा दर दिलेला नाही.  कोरेगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी फलटण-बारामतीला जात आहे. धोम धरणाच्या उभारणी वेळी कोरेगाव तालुक्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी होत नाही. मंत्रालयात पाणी वाटपाच्या बैठकांना आमदार उपस्थित राहात नाहीत. याचा अर्थ त्यांची पाणी नेण्याला संमती आहे.  कोरेगावच्या हक्काचे पाणी नेण्यास आमचा कडवा विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या वाट्याचे पाणी देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी लढा उभारावा लागला तरी चालेल. त्यात मागे राहणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
 युवा पिढी बरबाद करण्याचे पाप ‘त्यांचेच’
कोरेगावातून दहा वर्षे आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. तालुक्यात दर्जेदार आणि ठोस विकासकामे केली. औद्योगिक वसाहतीचा आराखडा देखील आमच्याच काळात मंजूर झाला होता.  दहा वर्षात त्यावर एक रुपयाचेही काम झाले नाही. 2009 मध्ये मी पुन्हा आमदार होऊ शकले असते, मात्र बारामतीतून ट्रकभर पैसा आणला. सर्वच ढाब्यांवर मटणाच्या जेवणावळी रंगल्या आणि दारुचा महापूर आला. युवा पिढीला व्यसनाधीन करत बरबाद केले. त्यांच्या या अक्राळविक्राळ ताकदीपुढे आमची ताकद कमी पडली आणि माझा पराभव झाला.  कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा कोरेगाव तालुक्यात सक्रिय होणार असून, जावलीचे पार्सल परत  पाठविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत योग्य आणि चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. त्याच्या विजयासाठी  प्रयत्न करणार आहे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: