Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ईव्हीएमबरोबर निवडणूक अधिकार्‍यांमध्ये दोष
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: mn3
भाजपच्या धार्मिक राजकारणावर शरद पवारांचे टीकास्त्र
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमबाबत शंका व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ईव्हीएमबरोबर निवडणूक व मतमोजणी अधिकार्‍यांबद्दलही शंका व्यक्त केली. या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही देशभरातील मित्र पक्ष आणि तज्ज्ञांशी बोलून येत्या काळात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या धार्मिक राजकारणावरही त्यांनी टीका केली.
राष्ट्रवादी
काँग्रेसच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली. तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल पुन्हा संशय व्यक्त केला. मतमोजणी करताना एक अधिकारी बसतो. त्या अधिकार्‍याच्या समोर एक मशीन असते. त्यातून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट अशा दोन्ही मशीनची मतमोजणी होते. इथून तिथे काय गेले, हे कोणाला कळत नाही.   
तुम्ही ज्यावर बटन दाबले, त्याची चिठ्ठी दिसली, त्यावर तुमचे समाधान झाले, इथपर्यंत बरोबर होते. या दोन्हींमध्ये काही गडबड नव्हती. काही तज्ज्ञांनी याविषयी वेगळी माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी मशीनमध्ये मतमोजणी झाली त्यात खरी गडबड
असल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला. व्हीव्हीपॅट मशीन
दोनच कंपन्या तयार करतात. या मशीनसंबंधी तंत्रज्ञ, तज्ज्ञांची बैठक दिल्लीत बोलवणार आहोत. त्यात या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
...तो लोकशाहीवरील हल्ला
देशात सध्या धार्मिक उन्माद वाढला आहे. दिल्ली आणि संसदेतही तो आता पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या एक भगिनी आमच्या शेजारी बसणार आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली. बॉम्बस्फोटातल्या आरोपीला तिकीट देणे हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे. लोकांच्या प्रश्‍नांवर काढलेले मोर्चे, आंदोलने या प्रकरणांमध्ये खटले असतात. मात्र, खुनाच्या, बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना तिकीट देणे, ही गंभीर बाब असल्याची टीका त्यांनी केली. देशाचे पंतप्रधान गुहेत जाऊन बसले आणि काय संदेश दिला? विज्ञानाच्या आधारे आधुनिक विचार केला जातो. मात्र, आपले पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. नरेंद्र मोदींनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादाला खतपाणी घातले. पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला. धार्मिक वातावरण तयार करून त्याचा राजकीय फायदा घेतला. देशावर हल्ला होतो आणि त्या मागे पाकिस्तान असल्याचे प्रोजेक्ट केले जाते. त्यावेळी इतर मुद्दे अंधारात टाकून राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणण्यात भाजप यशस्वी ठरला, असा आरोपही शरद पवारांनी केला.
शहरांकडे चला!
राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण चेहर्‍याचा पक्ष, ही ओळख बदलायला हवी. 50 टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे, हे विसरून चालणार नाही. आता तालुक्यातालुक्यात नागरीकीकरण झाले आहे. मुंबईत आपण कमी पडत आहोत, हे मान्य केले पाहिजे. शहरी भागात राष्ट्रवादीचा जोर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनदेखील शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.
तरुणांना संधी देणार
तरुण पिढी आपल्या पक्षात तयार झाली पाहिजे. लोकांना बदल हवा असतो. नव्या चेहर्‍यांना संधी द्यायला लोकांमध्येही उत्साह असतो. त्यामुळे प्रत्येक स्तरावर आपल्या पक्षात चेहरे बदल झाले पाहिजेत, याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या कामाची पद्धतही बदलली पाहिजे. सोशल मीडियाकडे, प्रामख्याने फेसबुक, ट्विटर याकडे अधिक लक्ष देण्याचे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: