Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एसीमधून वाया जाणारे पाणी झाडांसाठी
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 7 : एसीमधून वाया जाणार्‍या प्रतिदिन साडेचार लिटर पाण्याचा विनियोग झाडे जगवण्यासाठी करण्याचा उपक्रम आसिफ सय्यद, रा. दुर्गा पेठ, शाही मस्जिद समोर, सातारा यांनी गेल्या 2 वर्षापासून हाती घेतला आहे. सातार्‍यात एकीकडे पाण्याचा अपव्यय सुरू असताना दुसरीकडे मात्र आसिफ सय्यद यांनी गेल्या दोन वर्षांत लाखो लिटर पाणी वाचवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आसिफ सय्यद हे गेली 20 वर्ष येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची संकल्पना त्यांनी आपले सहकारी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजर वसुंधरा माने, कॉन्ट्रॅक्टर अनुप शिंदे, रसिक पटेल, हर्षद गुजर यांच्यासमोर मांडली. सर्वांच्या विचारातून मिशन ग्रुप अस्तित्वात आला. सर्वप्रथम या मंडळींनी अजिंक्यतारा किल्ल्यावर असणार्‍या मंगळाई देवीच्या मंदिरा पाठीमागे 25 ठिकाणी खड्डे घेऊन वृक्षारोपण केले. आज त्यापैकी 20 झाडांची वाढ अत्यंत चांगली झाली आहे. मध्यंतरीच्या काळात शेंद्रे, ता. सातारा येथील झोपडपट्ट्या आगीत जळून खाक झाल्यानंतर मिशन ग्रुपने पुढाकार घेऊन आपदग्रस्तांना कपडे, भांडी, संसारोपयोगी वस्तू देऊन मदत केली होती.
2 वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेने दुर्गा पेठेतील राजपथावर रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची झाडे लावली होती. मात्र या झाडांना पाणी देण्यात सातत्य न राहिल्याने अनेक झाडे पाण्याअभावी करपून गेली. आसिफ सय्यद यांच्या निवासस्थानाबाहेर दोन झाडे लावण्यात आली होती. मात्र पाण्याअभावी त्या झाडांची वाढ होत नव्हती ही बाब सय्यद यांच्या लक्षात आली. सय्यद यांच्या निवासस्थानामध्ये 3 एसी बसवण्यात आले आहेत. त्यामधून प्रतिदिन साडेचार लिटर पाणी वाया जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाया जाणारे पाणी नगरपालिकेने निवासस्थानासमोर लावलेल्या झाडांना पाइप लाइनच्या साह्याने देण्याची कल्पना त्यांना सुचली. 
त्यावर त्यांनी तत्काळ अंमलबजावणी केली. गेल्या दोन वर्षांपासून कडक उन्हाळ्याच्या दिवसात 3 एसीमधून प्रतिदिन साडेचार लिटर वाया जाणारे पाणी दोन पाइपलाइनच्या साह्याने त्यांनी झाडाच्या मुळाशी ठिबक पद्धतीने सोडले आहे. त्यामुळे झाडाच्या मुळाशी दिवसभर ओलावा राहण्यास मदत होत आहे. सय्यद यांनी गेल्या दोन वर्षात लाखो लिटर पाण्याची बचत करून वृक्षांची जोपासना करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. आसिफ सय्यद यांच्या निवासस्थानाशेजारी मयूर माने, उत्तम सगरे यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाहेर नगरपालिकेने लावलेल्या झाडाला या दोघांनी मोकळी पाण्याची बिसलरी उलटी टांगली असून दिवसभरात तीन ते चार वेळा या बाटलीमध्ये पाणी टाकण्यात येते. त्यामुळे ते झाड ताजे टवटवीत दिसून येत आहे.
पाण्याचा अपव्यय करणार्‍यांसाठी धडा
सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास जलाशयामध्ये सध्या 10 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. पाणीपुरवठा विभागाच्या पाहणी दौर्‍यामध्ये अनेक जण पाण्याचा अपव्यव करत असल्याचे दिसून आले आहे. काहीजण नळांना विद्युत मोटारी लावून अतिरिक्त प्रमाणात पाणी साठवण करून त्याचा दुरुपयोग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे काही सातारकर पाण्यासाठी अजिबात गांभीर्य दाखवत नसल्याचे स्पष्ट होत असताना दुसरीकडे मात्र आसिफ सय्यद यांनी पाण्याचा पाण्याचा थेंब वृक्षवाढीसाठी वापरून पाण्याचा अपव्यय करणार्‍या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घातल्याचे मानले जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: