Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘नीट’ परीक्षेत नलीन खंडेलवाल देशात अव्वल
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: na1

निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) गेल्या महिन्यात घेतलेल्या ‘नीट’ (नॅशनल एलिजीबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राजस्थानच्या नलीन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. मुलींमध्ये तेलंगणाच्या माधुरी रेड्डीने पहिला क्रमांक मिळवला तर सार्थक भटने 720 पैकी 695 गुण मिळवून महाराष्ट्रात पहिला आणि देशात सहावा क्रमांक मिळवला.
दरम्यान, या परीक्षेत रसायनशास्त्राच्या पी 04 सेटमधील 163 क्रमांकाच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे देण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचे ठरवले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 5 मे रोजी घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेत राजस्थानच्या नलीन खंडेलवालने (701 गुण) देशात पहिला तर दिल्लीच्या भाविक बन्सलने (700) दुसरा क्रमांक मिळवला. उत्तर प्रदेशचा अक्षत कौशिकने (700) तिसरा, हरियाणाच्या स्वास्तिक भाटियाने (696) चौथा, उत्तर प्रदेशच्या अनंत जैनने (695) पाचवा तर महाराष्ट्राच्या सार्थक भटने (695) सहावा क्रमांक मिळवला. तेलंगणाच्या माधुरी रेड्डीने मुलींमध्ये पहिला तर देशात एकूण सातवा क्रमांक मिळवला. माधुरीला 695 गुण मिळाले. पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचा समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशची सभ्यता सिंग कुशवाहने 610 गुणांसह प्रथम क्रमांक
मिळवला आहे. महाराष्ट्रात पहिला आलेला सार्थक भट हा नाशिकचा रहिवासी असून सांगलीच्या साईराज मानेने दुसर्‍या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. साईराज देशात 34 व्या क्रमांकावर आहे. देशात 50 व्या क्रमांकावर असलेला जुन्नरचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा आला आहे. ‘नीट’ परीक्षेसाठी 15 लाख 19 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सात लाख, 97 हजार 042 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारे कौन्सेलिंग
होणार आहे.
केमिस्ट्रीत पाच गुणांचा घोळ
‘नीट’ परीक्षेचा निकाल लागल्यानंतर असंख्य विद्यार्थी नाराज झाले आहेत. हक्काचे पाच गुण कमी झाल्याने नाराज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. ‘नीट’ परीक्षेचा उत्तर संच (आन्सर की) 29 मे रोजी घोषित करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला. निकालासोबत उत्तर संच देण्यात आला. त्यामध्ये एका प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत. या विरोधात लातूरच्या रेणुकाई केमिस्ट्रीचे संचालक मोटेगावकर हे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहेत. ‘नीट’ परीक्षेत रसायनशास्त्राच्या पी 04 या सेटमधील 163 क्रमांकाच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्याकडे जाऊन याची पडताळणी केली असता ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’चे उत्तर चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राध्यापकांनीही एनसीईआरटीच्या पुस्तकात पडताळून पाहिल्यानंतर उत्तर चुकीचे असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: