Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
देशभरात आज रमजान ईद साजरी होणार
ऐक्य समूह
Wednesday, June 05, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5मुंबई, दि. 4 (वृत्तसंस्था) : मंगळवारी चंद्र दर्शन झाल्याने उद्या, दि. 5 (बुधवार) रोजी मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान ईदचा सण साजरा होणार असल्याचे हिलाल सीरत समितीने जाहीर केले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळसह देशातील विविध भागात चंद्रदर्शन झाल्याची माहिती मिळाल्याने समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या, रमजान ईद असल्याने देशातील मशिदींवर रोषणाई करण्यात आली आहे.
मुंबईत हिलाल सीरत समितीची सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू होती. देशात विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याने संपूर्ण देशात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चंद्रदर्शन झाल्याने 6 मेपासून पवित्र रमजानला सुरुवात झाली होती. तेव्हापासून पहाटेची सहेरी झाल्यानंतर दिवसभर नमाज, कुराण पठण आणि सायंकाळी इफ्तारी केली जात होती. अनेक मुस्लीम धर्मीयांनी दिवसभर कडकडीत उपवास ठेवला होता. मंगळवारी सायंकाळनंतर विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याची माहिती हिलाल सिरत समितीला देण्यात आली. काही ठिकाणी चंद्रदर्शन झाले नाही. त्याबाबत हिलाल सिरत समितीची सायंकाळनंतर बैठक झाली. बैठकीस मौलाना फकरुद्दीन, पदाधिकारी उपस्थित होते.   
त्यात रमजान ईद उद्या (बुधवार) साजरी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, असे सचिव राफीउद्दीन शेख यांनी सांगितले. औरंगाबादच्या अल-हिलाल समितीनेही बुधवारी ‘ईद-उल-फित्र’ असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरात विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अल-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना मोईजोद्दीन फारूखी यांनी दिली. केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील इतर देशांमध्येही उद्या (5 जून) रमजान ईद होणार आहे. सौदी अरेबियात आजच रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रमजानचा पवित्र महिना 30 दिवस चालतो. यावेळी मात्र 5 जून रोजीच रमजान ईद साजरी होणार असल्याने रमजानचा महिना 29 दिवसांचा असेल. 2018 मध्ये 16 जून रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली होती.
राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षांचे नेते यांनी मुस्लीम बांधवांना ‘ईद-उल-फित्र’निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: