Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अभूतपूर्व विजयानंतर रालोआची आज बैठक
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: mn1
प मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा प लवकरच पुन्हा शपथविधी होणार
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देदीप्यमान विजय मिळवल्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक उद्या (शनिवार) नवी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी जदयूचे नितीशकुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निमंत्रित केले आहे.
दरम्यान, सोळावी लोकसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आपल्या पदाचा आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. आता मोदींचा लवकरच पुन्हा पंतप्रधानपदाचा शपथविधी होणार आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू म्हणून काम करण्याची विनंती त्यांनी मोदी व मंत्रिमंडळाला केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवत सत्ता राखली. रालोआला तब्बल 350 जागा मिळाल्या असून भाजपला स्वबळावर 303 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीस पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. बैठकीस सुषमा स्वराज, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, मनेका गांधी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर व अन्य मंत्री उपस्थित होते. अरुण जेटली प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
बैठकीनंतर मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे एकत्रित सादर केले.   पंतप्रधान मोदींनी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन मंत्रिमंडळाच्यावतीने सामूहिक राजीनामापत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं. हा राजीनामा राष्ट्रपतींनी लगेच मंजूर केला. मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री मिळून 60 सदस्य आहेत. आता सतरावी लोकसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपत आहे. सतरावी लोकसभा 3 जूनच्या आधी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. तिन्ही निवडणूक आयुक्त लवकरच राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर आता रालोआची महत्त्वाची बैठक उद्या (शनिवार) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांच्यासह सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्वत: निमंत्रण दिले आहे. या बैठकीत निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे अभिनंदन करण्याबरोबरच नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने स्वबळावर 303 जागांचे प्रचंड बहुमत मिळवले असले तरी रालोआ देशाच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत, असे वक्तव्य मोदींनी 21 मे रोजी रालोआच्या बैठकीत केले होते. त्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करण्याचा मोदींचा मनोदय असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मातोश्री हिराबेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी 29 मे रोजी गांधीनगरला जाणार असून त्या आधी 28 मे रोजी वाराणसीला जाऊन मतदारांचे आभार मानणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: