Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: na1
राज बब्बर, अमेठीतील प्रभारींचा राजीनामा
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामीत सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. गांधी कुटुंबाचा गड असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी धक्कादायकरीत्या पराभूत केल्यानंतर तेथील काँग्रेसच्या प्रभारींनीही राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत काँगे्रसला खातेही उघडता आले नाही. या नामुष्कीमुळे येत्या काही दिवसांत काँग्रेसच्या आणखी काही पदाधिकार्‍यांचे राजीनामे येणे अपेक्षित आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादुई नेतृत्वाखाली भाजपप्रणित रालोआने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. रालोआने तब्बल 350 तर भाजपने एकट्याने 303 जागांवर विजय मिळवला. मोदी त्सुनामीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही इतकी केविलवाणी अवस्था काँगे्रसची झाली आहे.    
या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. तेथे यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी याच एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या राज बब्बर यांना स्वत:लाही फतेपूर सिक्री मतदारसंघात माती खावी लागली आहे. भाजपचे उमेदवार राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांचा तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज बब्बर 1989 पासून राजकारणात सक्रिय आहेत. 1989 मध्ये त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता दलातून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 2006 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला. मात्र, 2008 पासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक आहे. मी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू शकलो नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.
अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. येथे संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि स्वत: राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. या मतदारसंघात गांधी घराण्याने सलग सहा वेळा बाजी मारली होती. मात्र, या निवडणुकीत राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सादर केला आहे. राज बब्बर यांच्यानंतर ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: