Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सूरतमधील कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: mn2
विद्यार्थ्यांसह वीस जण मृत्युमुखी
5सूरत, दि. 24 (वृत्तसंस्था) : गुजरातमधील सूरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्प्लेक्स या इमारतीला शुक्रवारी लागलेल्या भीषण भीषण आगीत कोचिंग क्लासमधील 18 विद्यार्थ्यांसह 20 जण मृत्युमुखी पडले. यातील बहुतांश जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जणांनी इमारतीवरून उड्या मारल्याने त्यांचा अंत झाला. या दुर्घटनेत 24 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या  असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सूरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्प्लेक्स या इमारतीत एक डान्स क्लास आणि महापालिकेतर्फे चालवला जाणारा कोचिंग क्लास आहे. कोचिंग क्लास असलेल्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली. थोड्या वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या कोचिंग क्लासमध्ये 50 विद्यार्थी होते. त्यातील काही जणांचा होरपळून मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी इमारतीच्या चौथ्या आणि दुसर्‍या मजल्यावरून उड्या टाकल्या. त्यात काही जणांचा मृत्यू झाला. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाचे 20 बंब घटनास्थळी पोहोचले.  काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून 24 जखमी विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढले. त्यांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकार्‍यांनी व्यक्त केली.
तक्षशीला कॉम्प्लेक्स हे व्यापारी संकुल असून त्यात अनेक दुकाने आणि कोचिंग क्लासेस आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एसी डक्टस् आणि कॉम्प्रेसर्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारतीत ज्या मजल्यावर आग लागली तेथे महापालिकेतर्फे चालवला जाणार कोचिंग क्लास आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित घटना का घडली? इमारतीत आग नियंत्रण करणारी यंत्रणा नव्हती का? याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सूरतमध्ये एकूण 170 कोचिंग क्लासेस आहेत. आजच्या दुर्घटनेनंतर या सर्व क्लासेसचे परवाने आता रद्द करण्यात आले आहेत. त्या इमारतींचे सेफ्टी आणि फायर ऑडिट
केल्याशिवाय परवाने देण्यात येणार नाहीत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: