Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ईव्हीएम मशीनद्वारे घेतलेली निवडणूक प्रक्रिया शंकास्पद : खा. उदयनराजे भोसले
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 24 : देशात मोदींच्या विरोधात लाट होती. त्यातच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह बेरोजगारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असतानाही भाजपला बहुमत मिळाले, ही न पटणारी गोष्ट आहे. 11 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नाही आणि त्यांची पिछेहाट होती, ही बाबही न पटणारी आहे. ही निवडणूक प्रक्रिया शंकास्पद आहे. परदेशात बॅलेट पेपरचा वापर केला जातो, परंतु आपल्याकडे विरोध असतानाही मतदान यंत्राचा (ईव्हीएम)चा वापर केला जातो. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशिनवर विश्‍वास नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी आ. आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कराड दक्षिण राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ उंडाळकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, मागच्या वेळची परिस्थिती पाहून यावेळी सर्व विरोधकांनी या मतदान मशिनच्या ठिकाणी बॅलेट पेपरची मागणी या निवडणुकीदरम्यान केली होती. तरी ती का फेटाळली गेली? याला लोकशाही म्हणायची का हुकूमशाही! शेतकरी, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रात भाजप विरोधात वातावरण असताना याना एवढी मते मिळतात हे कशाचे लक्षण आहे. यात गैरप्रकार झाल्याचा संशय येतोय. राफेलच पुढे काय झालं हे कळत नाही, युवकांना नोकर्‍या देण्याच्या आश्‍वासनाचं पुढे काय झालं हे देखील समजल नाही.  
खोट्या आश्‍वासनावर सरकार चालल तरीही हेच पुन्हा बहुमताने येतात. ईव्हीएम मशिनवर माझा विश्‍वास नाही असे ते म्हणाले.
लोकांनी मला तिसर्‍यांदा निवडून दिले. मी त्यांचा अपेक्षाभंग करणार नाही. सर्वच लोकप्रतिनिधींनी माझे काम केले, त्यामुळे मला विजय मिळाला. यापुढे रखडलेले प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न अद्याप तसेच आहेत. लवकरच बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा भूमाता दिंडी आपण काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात हजारो गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. त्यात त्यांना पाण्याचा टँकरचा पुरवठा होताना लॉबिंग होताना काही ठिकाणी दिसतंय. त्यामुळे त्या लोकांना पाणी पुरवठा नीट होताना दिसत नाही. रोजगारहमीच्या राज्यातील कामामध्ये पुरेसे कामगार कार्यरत नाहीत मग ही कामे होणार कशी? असा सवाल करत शेतकरी व जनावरे यांच्यासमोरील पाणी प्रश्‍नांबाबत चिंता व्यक्त केली. सातार्‍यात मतदान का कमी झाले हे मी तपासणार आहे. राजकारण हे गजकर्णासारखे असते त्यात तडजोडी केल्या जातात. माझ्याबाबतीत कोणा-कोणामध्ये तडजोडी झाल्या हे मी पाहणार आहे. मात्र जे झालं ते चांगलंच झालं मला मागच्यावेळच्या मतापेक्षा आता साठ हजार मते अधिक पडली आहेत, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: