Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘वंचित’च्या प्रभावामुळे काँग्रेस आघाडीत चिंता
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
आता विधानसभेत सोबत घेण्याचे प्रयत्न करणार
5मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी राज्यातल्या सर्वच मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात मते घेतली असून चार महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न करावेत, असा सूर काँग्रेस आघाडीत उमटत आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्यानंतर त्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते; पण जागावाटपाची बोलणी फारशी पुढे गेली नाही. त्यांनी वेगळी निवडणूक लढवली आणि वंचित बहुजन आघाडीचा जबर फटका दोन्ही काँग्रेसना बसला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवाला वंचित आघाडीच कारणीभूत ठरली आहे. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींना आणि सांगलीत त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीमुळे झालेले मतविभाजन भोवले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी 1 लाख 70 हजार मते घेतल्याने सुशीलकुमार शिंदेंना भाजपच्या सिद्धेश्‍वर शिवाचार्य स्वामींकडून 1 लाख 58 हजार 608 मतांनी पराभव पत्करावा लागला. सांगलीत भाजपचे विजयी उमेदवार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्या मतातील अंतर 1 लाख 64 हजार इतके आहे. वंचित आघाडीच्या गोपीनाथ पडळकर यांनी तेथे तीन लाख मते घेतली आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: