Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पस्तीस तासांची मॅरेथॉन मतमोजणी
ऐक्य समूह
Saturday, May 25, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: na2
सर्व निकाल जाहीर; भाजपला 303 जागा
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालेल्या 542 जागांचे अधिकृत निकाल 35 तासांच्या मॅरेथॉन मतमोजणीनंतर अखेर शुक्रवारी हाती आले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्सुनामीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तब्बल 350 जागा जिंकल्या आहेत. आघाडीचे नेतृत्व करणार्‍या भाजपने त्यातील 303 जागा जिंकत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा चमत्कार सलग दुसर्‍यांदा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश असून काँग्रेसनंतर 300 जागांचा टप्पा पार करणारा भाजप हा देशातील दुसरा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसने 352 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 2014 च्या निवडणुकीत 336 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 282 जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. रालोआने सलग दुसर्‍यांदा त्रिशतकी मजल मारली आहे. यावेळी रालोआच्या जागा 14 ने वाढल्या तर भाजपला 2014 च्या तुलनेत 21 जागा जास्त मिळाल्या आहेत.
लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. मतदारांना पैशाचे वाटप करण्याचा प्रयत्न झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द केली होती.  
मतदान झालेल्या सर्व 542 जागांवरील मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता एकाच वेळी सुरू झाली. आज दुपारपर्यंत यापैकी 541 जागांचे अंतिम निकाल जाहीर झाले होते. अरुणाचल पश्‍चिम या मतदारसंघातील मतमोजणी मात्र लांबली होती. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास तेथे तब्बल 35 तासांचा कालावधी लागला. आज सायंकाळी सातच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तेथील निकाल जाहीर करण्यात आला.
ही अखेरची जागाही भाजपने जिंकली. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते किरेन रिजिजू यांनी अरुणाचल पश्‍चिम या मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे नबाम तुकी यांचा 1 लाख 74 हजार 843 मतांनी पराभव केला. रिजिजू यांना 2 लाख 25 हजार 796 तर तुकी यांना 50 हजार 953 मते मिळाली. या विजयाबरोबरच अरुणाचलमधील दोन्ही जागांवर भाजपचे कमळ फुलले आहे. अरुणाचल पूर्व या जागेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तापिर गावो यांनी काँग्रेसचे लोवांगचा वांगट यांचा पराभव केला. अंतिम निकालानंतर रालोआने 350 तर यूपीएने 82 जागांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या महाआघाडील उत्तर प्रदेशात केवळ 15 जागा मिळाल्या. तेथे भाजपने तब्बल 64 जागांवर विजयश्री मिळवली. काँग्रेसला सोनिया गांधींनी लढवलेली रायबरेलीतील एकमेव जागा मिळाली. इतर पक्ष व अपक्षांनी 95 जागांवर विजय मिळवला. रालोआतील भाजपने 303 जागा जिंकल्या तर यूपीएतील काँग्रेसला अवघ्या 52 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सतराव्या लोकसभेतही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान 55 जागा जिंकणे आवश्यक आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: