Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीचा गड राखत उदयनराजे भोसले यांची कॉलर टाईट
ऐक्य समूह
Friday, May 24, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 23 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील राष्ट्रवादीचा गड कायम राखत आपली कॉलर आणखीनच टाईट केली. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 71 हजार 770 एवढी मते मिळाली असून त्यांना 1 लाख 15 हजार मतांच्या आसपास मताधिक्य मिळाले आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासह 8 जणांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 एवढी मते मिळाली. दरम्यान निकाल घोषित होताच खा. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. त्यांना शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवसेना भाजप, आरपीआय युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, वंचित आघाडीचे सहदेव आवळे, बीएसपीचेउमेदवार आनंद थोरवडे, दिलीप जगताप, अपक्ष उमेदवार पंजाबराव पाटील, सागर भिसे, अभिजित बिचुकले, शैलेंद्र वीर हे 9 उमेदवार रिंगणात होते. मतदानापूर्वी उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील या दोघांनी प्रचाराच्या निमित्ताने मतदार संघ ढवळून काढला होता. सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जिल्ह्यामध्ये उपस्थिती लावल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. प्रचाराचा धूळ खाली बसल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी 60 टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्‍या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये  (पान 1 वरुन)
आज गुरुवारी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रारंभी पोस्टल मतदानाच्या मोजणीस सुरुवात करण्यात आली. दुसरीकडे फेरीनिहाय मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री 8 वाजेपर्यंत 20 फेर्‍यांची मतमोजणी झाली. उमेदवारांची नावे आणि त्यांना फेरी क्रमांक 1 ते फेरी क्रमांक 18 पर्यंत पडलेली मते अनुक्रमे पुढीलप्रमाणे- खा.श्री.छ. उदयनराजे भोसले 29896,28655,4861,28314,30260,23176, 17086, 11200, 5936,  6654, 5207, 29549, 29576, 35144, 31308,30917,24685,18068,10502, 12358.
नरेंद्र पाटील 21581, 23450, 19215, 23779, 23236, 14830, 8510, 5671, 5930,6542,27875, 26447, 24489, 25528, 24235, 15718, 21152, 15718, 10502, 8294. आनंदा थोरवडे 324,377, 278, 380, 330, 352, 209, 119, 117, 125, 99, 326, 357, 394, 479, 311, 280, 185,138, 135. पंजाबराव पाटील 213, 279,230, 273, 255, 161, 102, 56, 44, 96, 67, 257, 731, 278, 265, 220, 195, 110, 93, 94. सागर भिसे 438, 542, 500, 448, 452, 367, 178, 139, 44, 96, 67, 386, 405, 379, 390, 175, 313, 196, 194, 242. दिलीप जगताप 253, 359, 242, 338, 274, 208, 132, 94, 30, 53, 49, 237, 253, 286, 265, 265, 187, 156, 130,94. सहदेव आवळे 2069, 2069, 1966, 2213, 2211, 1836, 1247, 558, 370, 577, 659, 431,2006, 2287, 2416, 2372, 1666, 3213,582,641. अभिजित बिचुकले 115, 136, 124, 135, 124, 110, 65, 22, 19, 26, 27, 125, 133, 108, 169, 113, 130,65, 44,58. शैलेंद्र वीर 273, 305, 260, 299, 308, 206, 147, 81, 41, 51, 40, 460, 343, 312, 306, 294, 230, 203, 123,110. नोटा 417, 525, 437, 448, 513, 408, 267, 153, 95, 84, 86, 573, 442, 491, 513, 471, 387, 319,208, 173. रात्री 8.30 वाजेपर्यंत 20 फेर्‍यांचे निकाल हाती आले होते. उर्वरित 3 फेर्‍यांचे निकाल जाहीर होण्यासाठी उशीर होणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. 20 फेर्‍यांमध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 71 हजार 770 एवढी तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 एवढी मते मिळाली. उदयनराजे भोसले यांना सुमारे 1 लाख 15 हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास उदयनराजे भोसले पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले. मात्र त्या ठिकाणी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने मी गुलाल अंगावर घेणार नाही, असे सांगत गाडीतून न उतरताच ते निघून गेले.
मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर औद्योगिक वसाहत येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रामध्ये जाणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची कडक तपासणी केली जात होती. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरामध्ये  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गस्तीपथकेही कार्यरत होते. दिवसभरात कोणतीही अनुचित घटना न घडता मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.
उदयनराजे यांच्या मताधिक्यात घट
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. देशामध्ये विक्रमी मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता. केंद्रात आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर भाजपने विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केले. जिल्ह्याला 10 हजार कोटींचा निधी देण्याबरोबर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांची मोट आवळली होती. त्यात या निवडणुकीत वंचित आघाडीने आपला उमेदवार उभा केल्याने  मोठ्या प्रमाणावर मते खाल्ली. 3 लाखांहून 1 लाख 15 हजार मताधिक्यावर आल्याने उदयनराजे यांच्या मताधिक्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले.
हा लोकशाहीचा
विजय : उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा मतदारसंघात लोकांनी मला तिसर्‍यांदा लोकसभेत पाठवले आहे. जिल्ह्यातील जनतेचा, पत्रकारांचा मी आभारी असून हा लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली. दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी हार तुरे आणू नयेत, गुलाल उधळू नये, मिरवणुका काढू नयेत असे आवाहन उदयनराजे यांनी केले.
यापुढेही जिल्ह्याच्या पाठीशी उभा
राहणार : नरेंद्र पाटील
सातारा जिल्ह्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मला मतदान केले. मी त्यांचा ऋणी आहे. या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मला मिळालेली मते पाहता माझी जबाबदारी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अधिकाधिक विकासकामे आणून यापुढेही जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: