Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्रात युतीची मुसंडी; 41 जागांवर बाजी
ऐक्य समूह
Friday, May 24, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत देशभरात घोडदौड करणार्‍या भाजपने शिवसेनेच्या साथीने महाराष्ट्रातही मोठे यश मिळवले आहे. राज्यातील 48 पैकी 41 जागांवर युतीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेल्या मतविभागणीचा तब्बल 13 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीला तडाखा बसला. युतीने 2014 च्या निवडणुकीतील यश कायम राखले असले तरी केंद्रीय मंत्री अनंत गीते व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, मोदी त्सुनामीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात एमआयएमने खाते उघडले असून इम्तियाज जलील यांनी शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबादमध्ये साडेपाच हजार मतांनी पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवत भाजपने देशाची सत्ता पुन्हा काबीज केली असून या यशात महाराष्ट्रानेही मोठा हातभार लावला आहे. 2014 ला भाजप-शिवसेना युतीला राज्यात 42 जागा मिळाल्या होत्या. एकूण राजकीय वातावरण, ग्रामीण भागातील नाराजीमुळे यावेळी हे संख्याबळ तीस-बत्तीसपर्यंत खाली येईल, असे अंदाज वर्तवले जात होते; परंतु हे अंदाज चुकवत युतीने पुन्हा 41 जागांवर बाजी मारली आहे. भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सहा जागा मिळाल्या आहेत. विदर्भात लोकसभेच्या दहा जागा असून त्या सर्व जागा युतीकडे होत्या. यावेळी चंद्रपूर व अमरावती या दोन जागा आघाडीने जिंकल्या आहेत. 
चंद्रपूरमध्ये शिवसेनेची आमदारकी सोडून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला तर अमरावतीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेचे मातब्बर खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमध्ये भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी, वर्ध्यात भाजपचे रामदास तडस, रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने, भंडारा-गोंदियात भाजपचे सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते, बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांनी विजय मिळवला.
मराठवाड्यातील आठ जागांपैकी सहा जागा युतीकडे व दोन जागा काँग्रेसकडे होत्या. यावेळी तेथील सर्व जागांवर भाजप-शिवसेना युतीने बाजी मारली आहे. भाजपच्या प्रताप चिखलीकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव केला. 2014 साली मोदी लाटेतही निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांना यावेळी ही जागा राखता आली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका चव्हाण यांना बसला. उस्मानाबादच्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा 1 लाख 27 हजार मतांनी पराभव केला. औरंगाबाद मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या चौरंगी लढतीत विजयाचे पारडे सतत फिरत होते. सुरुवातीच्या फेर्‍यांमध्ये चक्क तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या चंद्रकांत खैरे यांनी पुढच्या फेर्‍यांमध्ये जोरदार मुसंडी मारत एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांची आघाडी मोठ्या प्रमाणात कमी केली होती. मात्र, अखेरच्या फेर्‍यांमध्ये जलील यांनी आघाडी घेत खैरे यांना पराभूत केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्याची जागा कायम राखली.
मुंबईत युतीचा पुन्हा ‘सिक्सर’!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कौल ज्या पक्षाला मिळतो, तो पक्ष देशात सत्तेवर येतो, हे गृहीतक यावेळी पुन्हा प्रत्यक्षात आले. शिवसेना-भाजप युतीने मागच्या वेळी वेळी जिंकलेल्या सर्वच्या सर्व सहा जागा याही वेळी कायम राखल्या. शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा आणि पालघरची जागाही युतीने कायम राखली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत एक लाख मतांनी तर दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे दीड लाख मतांनी विजयी झाले आहेत. वायव्य मुंबईतून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर अडीच लाख मतांनी, मुंबई उत्तर-मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन एक लाख मतांनी, ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक सव्वादोन लाख मतांनी विजयी झाले आहेत. उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टींसमोर काँग्रेसच्या उमेदवार व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान उभे केले होते; परंतु गोपाळ शेट्टींनी त्यांचा गड राखला.
ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे, कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, भिवंडीत भाजपच्या कपिल पाटील तर पालघरमध्ये शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी विजयश्री मिळवली. रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी आपली जागा कायम राखली. जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. भारती पवार यांनी दिंडोरीची जागा जिंकली.
प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने गड राखले
पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीची तर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातार्‍याची जागा कायम राखली. मात्र, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमध्ये मोठ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला. तेथे अजित पवार यांनी आपली सगळी ‘ताकद’ पणाला लावली होती; मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांना दोन लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले. शिरूर मतदारसंघात मात्र शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पन्नास हजार मतांनी पराभूत करून गेली 15 वर्ष शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ काबीज केला. सांगलीत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांना पराभूत केले. कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या मुन्ना महाडिक यांना पराभूत केले. हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी धूळ चारली.
‘वंचित’चा काँग्रेस आघाडीला फटका
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे शेवटची बातमी आली तेव्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आघाडीवर होते. तेथे अत्यंत चुरशीची लढत होत असून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे व जलील यांच्यात विजयाचा लंबक सतत बदलत होता. औरंगाबाद वगळता वंचित बहुजन आघाडीला अन्यत्र यश मिळाले नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर व अकोला  दोन्ही मतदारसंघात पराभूत झाले; पण त्यांच्या उमेदवारांनी बारा ते तेरा मतदारसंघांमध्ये भरघोस मते घेतल्याने आघाडीला फटका आणि युतीला फायदा झाला आहे. नांदेड, सांगली, बुलढाणा, हातकणंगले, परभणी मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना लाखाच्या वर मते मिळाली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच तडाखा बसला.
राज्यात डॉक्टरांचा विजय
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राने सात डॉक्टरांना लोकसभेत पाठवले आहे. त्यामध्ये डॉ. सुजय विखे, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. भारती पवार, डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: