Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदींवरील विश्‍वासामुळे अभूतपूर्व विजय
ऐक्य समूह
Friday, May 24, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) : देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब जनता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर निवडून देण्यासाठी उत्सुक होती. देशात मोदींची सुप्त लाट जाणवते आहे, तिचे त्सुनामीत रूपांतर होणार असल्याचे मी नेहमीच सांगत होतो. आज तेच प्रत्यक्षात उतरले आहे. देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. युतीत मागच्या काळात झालेला कलह दुर्दैवी होता. मात्र, आता मळभ दूर झाले असून आगामी विधानसभा व त्यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्याने युतीत जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह व मित्र पक्षांचे अभिनंदन केले. मोदींबद्दल देशातील जनतेला प्रचंड विश्‍वास होता. महाराष्ट्रात दुष्काळ होता. इतरही समस्या होत्या; पण राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या कामगिरीवर जनता खूष होती. या समस्येतून आपल्याला महायुतीचेच सरकार बाहेर काढू शकते, हा विश्‍वास गेल्या साडेचार वर्षांतील कामामुळे जनतेच्या मनात होता. मोदींनीही केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत राज्याला केली. त्यामुळे गेल्या वेळपेक्षा आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. आता जनतेच्या या प्रेमामुळे आनंद तर झाला आहेच; पण झोपदेखील उडाली आहे. कारण आता या प्रेमानुरूप अधिक चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. उद्यापासून अधिक जोमाने कामाला लागणार आहोत. घटक पक्षांनीही भाजपला चांगली साथ दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत चांगला समन्वय ठेवला. भाजप आणि शिवसेनेने एकमेकांना चांगली मदत केली. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांचा एकही उमेदवार नसतानाही राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांसाठी दौरे केले. पक्षाचे सर्व मंत्री, पदाधिकार्‍यांनीदेखील चांगले काम केले आहे. त्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर
भाजप पक्ष कार्यालयात विजयाचा जल्लोष केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. तेथे एकमेकांना मिठाई भरवून फडणवीस आणि ठाकरे यांनी आनंद साजरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना युती अभेद्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 2014 ला लोकसभेत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले आणि विधानसभेत युती तुटली होती, याची आठवण करून दिली तेव्हा त्या अनुभवातून आम्ही शिकलो आहोत, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. झाले ते दुर्दैवी होते. आता तसे होणार नाही. आता युती अभेद्य राहील. विधानसभा निवडणुकांसह सर्व निवडणुका आम्ही आता महायुती म्हणूनच लढवू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. युतीमध्ये आता मोठा भाऊ कोण आहे, या तिरकस प्रश्‍नावर मुख्यमंत्री फडणवीस, यांनी ‘उद्धव हे माझे मोठे भाऊ आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव यांचे मोठे भाऊ आहेत’, असे मार्मिक उत्तर दिले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे युतीची प्रेरणा होते. आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण येत आहे. यापुढे युती म्हणून जनतेसाठी काम करू. सत्तेबद्दल विश्‍वासार्हतेची परंपरा भाजप-शिवसेना महाराष्ट्रात रुजवत आहे. विजयाचा आनंद साजरा करतानाच आमची भेट झाल्यावर पहिली चर्चा दुष्काळाची कामे वेगाने करण्यासाठी काय काय करता येईल यावरच झाली. आम्ही लगेच कामाला लागत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: