Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मतदारांचा जातीपातीला नकार, विकासाला होकार
ऐक्य समूह
Friday, May 24, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: mn1
‘मोदी इज बॅक’, त्सुनामीत विरोधकांचा सफाया
5नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : 2014 साली मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाची पुनरावृत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित रालोआने मागील निवडणुकीपेक्षाही मोठे यश मिळवून तब्बल साडेतीनशे जागा पटकावल्या आहेत. 2014 साली देशात मोदी लाट होती तर यंदा या लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाले. या त्सुनामीत काँग्रेससह विरोधी पक्षांचे आव्हान पालापाचोळ्यासारखे उडून गेले. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी निवडणूक झाली. वेल्लूर येथील एका जागेची निवडणूक आयोगाने रद्द केली होती. मतदान झालेल्या जागांपैकी जवळपास तीनशे जागांवर भाजपने स्वबळावर मुसंडी मारली आणि मित्रपक्षांच्या साथीत प्रचंड बहुमताने देशाची सत्ता पुन्हा काबीज केली आहे. भाजपच्या या यशामुळे राजकीय पंडित थक्क झाले आहेत. मात्र, काही वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी केलेले एक्झिट पोल जवळपास योग्य ठरले आहेत.
या निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी राफेल करारातील कथित भ्रष्टाचारावरून उठवलेले वादळ, मोदींवर केलेली व्यक्तिगत टीका विरोधकांना फलद्रुप झाली नाही. गरिबांना वर्षाला 72 हजार रुपयांच्या  उत्पन्नाची हमी देणारी योजना जाहीरनाम्यात समाविष्ट करूनही राहुल गांधींच्या काँग्रेसला देशातील जनतेकडून ‘न्याय’ मिळू शकला नाही. स्वत: राहुल गांधींना अमेठी या बालेकिल्ल्यात स्मृती इराणी यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. मात्र, केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे राहुल गांधींची नामुष्की टळली.
मोदी त्सुनामीत भाजपने पुन्हा एकदा गुजरातमधील सर्वच्या सर्व 26, मध्य प्रदेशात 28, कर्नाटकात 24, हरियाणात सर्व 10, उत्तराखंडमध्ये सर्व पाच, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, झारखंडमध्ये 11 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. सप-बसप आघाडीच्या आव्हानामुळे उत्तर प्रदेशात भाजपच्या तब्बल 40 जागा घटतील, असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी लावला होता. मात्र, भाजपने तेथे 60 जागा घेऊन विरोधकांच्या आव्हानातील हवाच गुल केली. गेल्या वेळी भाजपला तेथे 71 जागा मिळाल्या होत्या. त्यात फक्त 11 जागांची घट यंदा झाली. त्याचबरोबर भाजपने ममता बॅनर्जींच्या पश्‍चिम बंगालमधील बालेकिल्ल्याला प्रथमच जोरदार सुरुंग लावत तेथे तब्बल 17 जागांवर विजय मिळवला. दिल्लीतील सातही जागा भाजपने यावेळी पुन्हा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने अनुक्रमे 23 आणि 18 जागा जिंकल्या. बिहारमध्येही भाजप-जदयू युतीने 40 पैकी 39 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 17 तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने 16 जागा जिंकल्या. काँग्रेसला एक जागा मिळाली तर लालूप्रसाद यादव यांच्या राजदला खातेही उघडता आले नाही. जम्मू-काश्मीरमध्येही भाजपने तीन जागा जिंकून आपला करिश्मा दाखवला. भाजपने कर्नाटकाबरोबरच उर्वरित दक्षिण भारतातही चांगली कामगिरी केली आहे. तेलंगणात भाजपने चार जागांवर कब्जा केला तर केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे चांगली मते मिळवली.
दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आणि उत्तर प्रदेशात स्थापन झालेल्या महाआघाडीची दाणादाण उडाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. स्मृती इराणी यांचा विजय अधिकृतरीत्या जाहीर होण्याआधीच राहुल गांधी यांनी आपला पराभव स्वीकारत पत्रकार परिषदेत इराणींचे अभिनंदन केले. गेल्या निवडणुकीत रालोआला 336 जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्‍वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला होता. देशातील जनतेनेही मोदींवर विश्‍वास दाखवून त्यांच्याकडे देशाचा कारभार पुन्हा एकदा सोपवला आहे. त्यामुळे आता मोदी सरकारला मागील टर्ममध्ये राहून गेलेल्या आर्थिक सुधारणा करता येतील. त्याशिवाय देशाच्या विकासाकडे आता आणखी जोमाने लक्ष देता येईल.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर 282 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने तब्बल 18 जागांची वाढ करून तीनशेची मजल मारली आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे स्वबळावर आधीच्या टर्मपेक्षा अधिक जागा मिळवणारे 1984 नंतरचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. पतंप्रधानपदाच्या पहिल्या टर्मपेक्षा दुसर्‍या टर्ममध्ये जास्त जागा यापूर्वी इंदिरा गांधी यांनी जिंकल्या होत्या. 1967 च्या लोकसभेपेक्षा इंदिरा यांना 1971 च्या लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, 1971 ला त्यांनी स्वत:चा वेगळा गट केला होता.  
त्यानंतर 1980 आणि 1984 या दोन टर्ममध्ये पुन्हा काँग्रेसला पहिल्याहून अधिक जागा मिळाल्या, मात्र, या दोन टर्मपैकी 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या तर 1984 ला राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. त्या आधी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकताना मागील वेळेपेक्षा पुढील निवडणुकीत अधिक जागा मिळवल्या होत्या.
भाजपच्या या त्सुनामीत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. भाजपमधून बंडखोरी करून काँगे्रसमध्ये गेलेल्या शत्रुघ्न सिन्हांना बिहारमधील पाटणासहिब मतदारसंघात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी धूळ चारली तर सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप किंवा मित्र पक्षांच्या उमेदवारांकडून पराभूत झाले. त्यात भोपाळमधून दिग्विजयसिंहांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. मालेगाव बाँबस्फोटानंतर काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद‘ हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर म्हणून भाजपने याच स्फोटाच्या कटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहला भोपाळमध्ये निवडणूक रिंगणात उतरवले होते. साध्वीनेही दिग्गीराजांना पराभूत करून पक्षाचा विश्‍वास सार्थ ठरवला. लोकसभेतील काँगे्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांचाही पराभव झाला.
हा विजय देशाचा, लोकशाहीचा : मोदी
दरम्यान, या विजयाबद्दल मोदींनी देशवासीयांचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आजचा हा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. कोणी विजयी झाले आहे तर तो भारत देश, भारताची लोकशाही विजयी झाली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर सायंकाळी पक्ष मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, 2019 लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होतो. देशातल्या कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली. भारताच्या 120 कोटी नागरिकांना मी माथा झुकवून नमन करतो. लोकशाहीत मतदानाची ही आकडेवारी हीच ऐतिहासिक घटना आहे. देश स्वतंत्र झाला. लोकसभेच्या इतक्या निवडणुका झाल्या; पण स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झाले, तेही 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान असताना. त्यातून मतदारांची जागरूकता, लोकशाहीसाठी लोकांची कटिबद्धता दिसली. ही निवडणूक राजकीय पक्षांनी नव्हे तर देशातील जनतेने लढवली. भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. लोकशाहीसाठी ज्या लोकांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी सहवेदना व्यक्त करतो. या लोकशाहीच्या उत्सवात निवडणूक आयोग, सुरक्षा दले, निवडणुकीची व्यवस्था सांभाळणार्‍या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.
हा तर जनतेचा विजय
महाभारताचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाला विचारले गेले होते, की तुम्ही कोणत्या बाजूने होतात. तेव्हा श्रीकृष्णाने जे उत्तर दिले होते, ते आज जनतारूपी श्रीकृष्णाने दिले आहे. आपले नागरिक भारतासाठी उभे होते. त्यांनी भारतासाठी मतदान केले. नागरिकांची हीच भावना देशाच्या विकासाची गॅरंटी आहे. ही निवडणूक कोणता पक्ष, कोणता नेता लढत नव्हता तर ही निवडणूक देशाची जनता लढत होती. माझी ती भावना आज जनतेने प्रकट केली,’ अशा शब्दात मोदींनी जनतेचे आभार मानले.
शरीराचा प्रत्येक कण देशवासीयांसाठी
2014 ला तुम्ही मला जास्त ओळखत नव्हता तरी माझ्यावर विश्‍वास ठेवून सत्ता दिली. आता 2019 मध्ये मला जाणून घेऊन तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवला. या विश्‍वासामुळे जबाबदारी वाढली आहे. रालोआच्या घटक पक्षांनीही मदत केली. मला देशवासीयांना सांगायचे आहे, की यापुढेही वाईट इराद्याने कुठलेही काम करणार नाही. काम करताना चूक होऊ शकते; पण वाईट हेतूने काम करणार नाही. मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. माझ्या कार्यकाळातील प्रत्येक क्षण, माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशवासीयांसाठी असेल. तुम्ही जेव्हा माझे मूल्यांकन कराल तेव्हा ते तीन निकषांवर करा आणि मी चुकलो तर सांगा, असे मोदी म्हणाले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: