Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात विरोधकांना यश
ऐक्य समूह
Friday, May 24, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 23 : सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना गेल्या 25 वर्षांपासून श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणावर पकड निर्माण करत  हा बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयाने या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात विरोधक यशस्वी झाले आहे. या विजयाबद्दल रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेला महिनाभर निकालाची उत्सुकता
दि. 23 एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. त्यानंतर सुमारे महिनाभर निकालासंबंधी सतत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. या मतदारसंघात एकुण 31 उमेद्वार निवडणूक आखाड्यात होते. मात्र अटीतटीचा आणि चुरशीचा सामना राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे आणि भाजपचे रणतजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात झाला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजयराव मोरे किती मत खाणार यावर विजय कोणाचा हे ठरेल, असे काहींचे मत होते. तर काही जण राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अबाधीत राहील आणि संजयमामा शिंदे विजयी होतील, असा अंदाज बांधीत होते. मात्र, भाजपच्या वर्तुळात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत होते.
विजयाची घोषणा होण्यापूर्वीच जल्लोष
या पार्श्‍वभूमीवर महिनाभरातील चर्चेला छेद देत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतलेली आघाडी आणि जवळपास विजय निश्‍चित असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी मतमोजणीला सोलापूर येथे सुरुवात झाल्यापासून दोन्ही उमेदवारांचे समर्थक विजय आपलाच असल्याच्या आनंदात होते. मात्र दुपारी 3 नंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतलेली आघाडी पाहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फलटण शहर व तालुक्यात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.
खा. शरद पवार यांची उमेदवारीची घोषणा
मतदार संघाच्या पुनर्रचनेत माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा,
माळशिरस आणि सांगोला या चार आणि फलटण व माण-खटाव या सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश
करण्यात आला. 2009 मध्ये या मतदारसंघात प्रथम पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळी खा. शरद पवार मोठ्या मताधिक्याने येथून विजयी झाले. त्यानंतर 2014 च्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील देशभर मोदी लाट असतानाही या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर आता 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला या संबंधी चर्चा सुरु असतानाच खा. शरद पवार यांनी आपण स्वत: पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. साहजिकच त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याला पुर्णविराम मिळाला असला तरी आता खा. शरद पवार यांच्या विरुद्ध भाजप-सेनेचा किंवा अन्य पक्षांचे उमेदवार कोण असणार या विषयी चर्चा सुरु राहिली असतानाच खा. शरद पवार यांनी फलटण येथील राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांनी केलेली घोषणाबाजी व केलेल्या आरोपामुळे माढा लोकसभा मतदारसंघ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी चर्चेच्या फेर्‍या
दरम्यान, दूध व साखर व्यवसायातील एक अभ्यासू, तरुण व्यक्तिमत्व युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची अ.भा.राष्ट्रीय काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असतानाच माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या संबंधी चर्चेच्या अनेक फेर्‍या सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये खा. शरद पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होईपर्यंत सुरु होत्या. त्यातून दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेेते एकत्र आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष व भाजपचे विद्यमान उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा समावेश होता. खा. शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीची चर्चा या सर्व नेते कार्यकर्त्यांमध्ये सुरु राहिली. त्यातून राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी केवळ आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपण मदत करावयाची आणि त्यानंतर येणार्‍या विधानसभा अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मात्र हा आघाडी धर्म पाळला जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत या वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य न करण्याची चर्चा गतीमान झाली.
खा. शरद पवार यांची अचानक माघार
उमेदवारीबाबत चर्चा सुरु झाली असतानाच खा. शरद पवार यांनी एका घरातील किती उमेदवार निवडणूक आखाड्यात असावेत, असा सवाल करत आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक  लढविणार नसल्याची घोषणा केली. साहजिकच राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना  पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज बांधला गेला. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने खा. मोहिते-पाटील यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष करत अन्य उमेदवारांबाबत चाचपणीला सुरुवात केली. त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष युवानेते श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाला संपूर्ण माढा मतदारसंघातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मात्र त्यांच्याही नावाची राष्ट्रवादीने दखल घेतली नाही.
संजयमामांच्या उमेदवारीची चर्चा
 भाजपच्या मदतीने खा. मोहिते-पाटील यांना शह देत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आरुढ झालेल्या माढा, करमाळा तालुक्यात साखर कारखाना, सुतगिरणी व अन्य सहकारी संस्थांद्वारे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला. मात्र उमेदवारीबाबत सुरु असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांसमवेत काही वेळ संजयमामा शिंदे चर्चेत राहिले होते. त्यांनाच राष्ट्रवादी उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट झाले.
खा. मोहिते-पाटील यांचा संयम
आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येवूनही
खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संयम राखून वाट पाहण्याचा पवित्रा घेतला. मात्र, त्यांचे सुपुत्र माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संयम राखता आला नाही आणि मोहिते-पाटील कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजपमधील काही नेत्यांशी संपर्क साधला. त्यातून माढा मतदारसंघात एक शक्तीमान घराणे आपल्या सोबत येत असेल तर त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरु झाली. मात्र मोहिते-पाटील कुटुंबाने आपल्याला उमेदवारी किंवा अन्य कशाची अपेक्षा नाही केवळ आपल्यावर होणार्‍या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी विरोधी असलेल्या नेते, कार्यकर्त्यांच्या गटातून चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु झाली.
रणजिसिंहांच्या भाजप उमेदवारीवर शिक्का मोर्तब
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे यांच्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी विरोधी नेत्यांशी असलेली जवळीक आणि नुकतेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले असल्याने भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी घ्यावी की नाही या संबंधी चर्चा, बैठका  सुरु झाल्या. त्यातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते, कार्यकर्त्यांशी चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. माढ्यातून भाजपची उमेदवारी स्वीकारावी की नाही, याबाबत अनेक मतमतांतरे पुढे येत राहिली. मात्र अखेर अध्यक्षपदासह काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे विशेष लक्ष
 संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादीचे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे उमेदवार म्हणून आमने सामने उभे ठाकल्यानंतर त्या अगोदर असलेली मैत्री दुरावली आणि निवडणुकीच्या रणांगणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या. त्यातच मुख्यमंत्री, महसूल मंत्री व राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांसह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही प्रचारात सहभागी होवून वातावरण रणजितसिंहांच्या बाजूने वळविले. किंबहुना सारा माहोल भाजपमय झाला. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी
जाहीर सभा अकलूज येथे झाल्यानंतर रणजितसिंहांचा विजय निश्‍चित मानला जात होता.
या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी हा संपूर्ण मतदारसंघ जाहीर सभा आणि
मतदारांच्या गाठी भेटीने पिंजून काढीत संजयमामा शिंदे यांच्या मागे मोठी शक्ती उभी केली. संजय मामा शिंदे त्यांचे बंधू आ. बबन शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते यांनीही संजयमामांना विजयी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यातून राज्यभर असलेली भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या आकर्षणाच्या पार्श्‍वभूमीवर या मतदारसंघातही मतदारांनी आपला कौल भाजप  उमेदवार रणतजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या बाजुने दिल्याने त्यांचा विजय निश्‍चित झाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: