Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोण बाजी मारणार महाराष्ट्रात? आज फैसला
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : केवळ पुढचे सरकारच नव्हे तर देशाची पुढची दिशा ठरवणार्‍या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (दि. 23) होत असून छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आशीर्वाद यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्या निवडणुकीत 48 पैकी 42 जागा जिंकणार्‍या भाजपा-शिवसेना युतीला हे यश राखता येईल का, याबद्दल शंका व्यक्त होत असताना युतीचे नेते आपल्या दाव्यांवर ठाम आहेत. मात्र, आघाडीला किमान 22 जागा मिळतील, असा विरोधकांचा दावा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, हंसराज अहिर, सुभाष भामरे, राज्याचे मंत्री गिरीश बापट, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी दिग्गज उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.
गेले दोन महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा फैसला गुरुवारी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून अत्यंत चुरशीची लढत  असलेल्या महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मागच्या निवडणुकीत ‘छत्रपतीजी का आशीर्वाद, चलो दे मोदी का साथ’, अशी घोषणा देत मैदानात उतरलेल्या शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 42 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली होती. यावेळी हे यश राखण्यात युतीला यश मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’मध्ये युतीचे संख्याबळ घटले तरी 32 ते 37 जागा युतीलाच मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व अंदाज चुकवणारे निकाल येतील, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील लक्षवेधी लढती
एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असून दिग्गज उमेदवारही ‘गॅस’वर आहेत. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेसच्या नाना पटोले यांच्याशी जोरदार लढत झाली. गडकरी निवडून येतील, असा अंदाज व्यक्त होत असला तरी आपण पाच लाख मतांनी निवडून येऊ, असा दावा नाना पटोले करत आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापुढेही शिवसेनेची आमदारकी सोडून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या सुरेश धानोरकर यांनी आव्हान उभे केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना भाजपच्या प्रताप चिखलीकर यांनी तुल्यबळ लढत दिल्याने चव्हाण आपल्या मतदारसंघात अडकून पडले होते.
शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांनी आव्हान उभे केले आहे. भाजपने या मतदारसंघात भरपूर जोर लावल्याने सुप्रिया सुळे यांना यावेळी बरेच कष्ट उपसावे लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबात झालेला कलह लपून राहिलेला नाही. पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार या मतदारसंघात तळ ठोकून बसले होते. या दोन जागांमुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला
लागली आहे.
बहुजन वंचित आघाडीची धास्ती
प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीमुळेे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर व अकोला येथे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे सोलापूरची लढत तिरंगी झाली असून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अडचण झाली आहे. या शिवाय औरंगाबाद आणि सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील व गोपीचंद पडळकर यांनी चांगली लढत दिली आहे. या शिवाय अनेक मतदारसंघातही वंचित आघाडीच्या उमेदवारांनी बर्‍यापैकी मते घेतली असून त्यांना मिळणार्‍या मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची भीती असल्याने सर्वच उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. त्यामुळे उद्या मतदान यंत्रातून काय बाहेर येणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बारामती-नांदेडही जिंकू : दानवे
मागच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशापेक्षा अधिक यश यावेळी मिळेल. बारामती, नांदेड, माढा, हातकणंगले व सातारा या जागाही आम्ही जिंकू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
दानवेच अडचणीत : अशोक चव्हाण
रावसाहेब दानवे काहीही वल्गना करत असले तरी त्यांची स्वतःचीच जालन्याची जागा अडचणीत आहे. तेथे काँग्रेसने त्यांची दमछाक केली आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आघाडीला राज्यात मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.
आघाडीला 22 जागा : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 22 जागांवर विजय मिळवेल. पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. पुढील लोकसभा त्रिशंकू असेल आणि पर्यायी सरकार बनवण्यात शरद पवार महत्वाची भूमिका बजावतील, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: