Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re2
5मायणी, दि.22 : येथील आबासाहेब जगन्नाथ माने यांचा चिरंजीव जयेश (वय 14) याचा मामाच्या गावात विहिरीत बुडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, की जयेशच्या  शाळेला सुट्ट्या लागल्याने तो नेवरी, ता.खानापूर येथे मामाच्या गावी यात्रेसाठी गेला होता. मंगळवार, दि. 21 रोजी आपल्या नातेमंडळातील काही मुले व गावातील मुलांबरोबर तो पोहण्यासाठी तिथेच जवळ असणार्‍या विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते.  
त्यामुळे तो विहिरीच्या काठावर बसला होता. बाकीची मुले पोहण्याचा आनंद घेत होते. पण थोड्याच वेळात त्यातील काही मुलांना जाणवले, की जयेश ठिकाणी नाही. त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु तो मिळून न आल्यामुळे चुकून त्याने विहिरीत उडी मारली का असा विचार करून मुलांनी शोधाशोध केल्यानंतर विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. जयेश हा नुकताच नववीत गेला होता. तो भारत माता विद्यालयाचा अतिशय हुशार व मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने उत्तुंग यश मिळवले होते. त्यामुळे मायणी परिसरात त्याच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: