Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उदयनराजे हॅट्ट्रिक साधणार की नरेंद्र पाटील परिवर्तन घडवणार?
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 22 : सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असताना काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हॅटट्रिक साधणार का शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील परिवर्तन करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघातील निकाल स्पष्ट होणार असल्याने दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती दिल्यानंतर भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील जाहीर सभेत नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातात शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय युतीकडून नरेंद्र पाटील यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. वाई, कराड, खंडाळा, महाबळेश्‍वर या ठिकाणच्या माथाडी कामगारांचे मतदान डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र पाटील यांनी या तालुक्यांमध्ये पदयात्रा, कोपरा सभा घेऊन वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला.  
दुसरीकडे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या आमदारांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदारसंघातील कानाकोपर्‍यामध्ये जाऊन उदयनराजे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करीत विधानसभा निवडणुकीची चाचपणी केली. खा. शरद पवार यांचे सातार्‍यावर असणारे प्रेम पाहून शिवसेना-भाजपने आपले संपूर्ण लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघावर केंद्रित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोरेगाव आणि सातारा या दोन ठिकाणी सभा झाल्या. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची कोरेगाव येथे एक सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी कराड येथे सभा घेऊन राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात स्थानिक प्रश्‍नांना फारसे महत्त्व दिले नाही. दुसरीकडे प्रचारसभांमध्ये विकासापेक्षा वैयक्तिक टीका टिपणीला अधिक महत्त्व दिले गेल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र पाटील यांनी आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची येथील चंद्रविलास हॉटेलमध्ये भेट घेऊन त्यांच्यासमवेत केलेली मिसळ डिप्लोमसी जशी चर्चेत राहिली तसेच प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढून मेढा येथील एका कार्यक्रमात आ. श्री. शिवेंद्रसिहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या गळ्यात नरेंद्र पाटील यांनी घातलेला सातारी कंदी पेढ्यांचा हार ही घटना लोकसभा निवडणुकीत लक्षणीय ठरली. निवडणुकीमध्ये ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश बापट, ना. शेखर चरेगावकर, पंढरपूर येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वावर पाहायला मिळाला. आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सातारा दौर्‍यानंतर आरपीआयचे अध्यक्ष अशोक गायकवाड आपल्या फौजफाट्यासह नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले. शेवटच्या टप्प्यात प्रचारामध्ये सहभागी होणार्‍या आरपीआयचा नरेंद्र पाटील यांना किती फायदा झाला, हे उद्या स्पष्ट होणार आहे. दरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातारा येथील गांधी मैदानावर घेतलेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद मतांमध्ये किती परिवर्तित होतो, हे निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच 60 टक्के एवढे उच्चांकी मतदान झाले. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत मतदान झाल्यानंतर अनेकांच्या पैजा लागल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी आणि येथील जिल्हा परिषद मैदानावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सांगता सभेला झालेली गर्दी पाहता या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातही उदयनराजे भोसले यांचेच पारडे जड असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रत्यक्षात उद्या निकाल काय लागतो याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
बंदोबस्तासाठी 1 हजार पोलीस तैनात
उद्या 23 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुमारे 1 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 1 पोलीस अधीक्षक, 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 3 डीवायएसपी, 7 पीआय, 26 पीएसआय, 271 पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड मतदान केंद्र परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.  सातारा शहरामध्ये 160 पोलिसांचे गस्ती पथक, 100 एसआरपी कर्मचारी, 400 शीघ्र कृतिदलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: