Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
देशाचा कौल कुणाला...?
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
आज मतमोजणी; यंत्रणा सज्ज एक्झिट पोल खरे ठरणार का?
5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास दीड-दोन महिने प्रचाराची रणधुमाळी झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा उद्या (दि. 23) 542 जागांसाठी होणार्‍या मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. आता भाजपप्रणित रालोआचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सत्ता राखणार, की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून घेणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे यावेळी अंतिम निकालांना चार ते पाच तास उशीर होईल, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.
दरम्यान,शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर आले. या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला 302 ते 336 जागा मिळून सरकार पुन्हा सत्तेवर येणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा नारा खरा ठरेल, असा भाजपला विश्‍वास आहे. मात्र, हे एक्झिट पोल चुकीचे ठरतील, असा दावा करत त्यांचे निष्कर्ष विरोधी पक्षांनी फेटाळले आहेत. त्यामुळे निकालाकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी तब्बल 338 जागा जिंकणार्‍या भाजपप्रणित रालोआ यंदा त्या जागा राखणार का, याची उत्सुकता आहे.
यंदाची निवडणूक प्रचाराची पातळी खालावल्याने प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. भाजपप्रणित रालोआसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हेच खरे ‘स्टार’ प्रचारक ठरले असून काँगे्रसच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशभरात रान उठवले. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, टीआरएसचे चंद्रशेखर राव, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, वायएसआर काँग्र्रेसचे जगनमोहन रेड्डी आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे तेथील निकालाकडेही देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.      
मतमोजणीस गुरुवारी सकाळी 8 पासून प्रारंभ होईल. त्यानंतर काही तासांतच मतमोजणीचे कल बाहेर यायला सुरुवात होईल. मात्र, यंदा प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतपावत्यांची पडताळणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पडताळणीमुळे अंतिम निकाल चार ते पाच तास किंवा त्याहून उशिरा जाहीर होतील, अशी शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.
मतमोजणी संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिल्लीतील निर्वाचन सदनात 24 तास ईव्हीएम नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ईव्हीएमबाबतच्या तक्रारी या नियंत्रण कक्षाकडे मांडता येतील. विरोधी पक्षांनी ईव्हीएम छेडछाडीचे आरोप करून निवडणूक आयोगाविरुद्ध राळ उडवून दिल्याने आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलले आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उद्या मतमोजणी केंद्राभोवतीही याच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षकांसमोर ईव्हीएम मशीनची सील फोडून त्यानंतर मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. यंदा सुरक्षा दलांच्या 18 लाख कर्मचार्‍यांपैकी तब्बल साडेसोळा लाख कर्मचार्‍यांनी पोस्टल मतपत्रिकांच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे यंदा पोस्टल मतपत्रिकाची संख्या खूप वाढल्याने या मतपत्रिकांची मोजणी आधी सुरू न करता ईव्हीएमबरोबरच करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळेही अंतिम निकाल जाहीर होण्यास आणखी थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक म्हणजे सरासरी 67.11 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील हे विक्रमी मतदान आहे. 542 मतदारसंघांमध्ये तब्बल आठ हजार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा फक्त वाराणसी मतदारसंघाची निवड केली असून रालोआला दुसरी टर्म मिळावी यासाठी त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी आपल्याल पारंपरिक अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची जाणीवपूर्वक निवड केली आहे. त्याचबरोबर केंद्रातील दिग्गज मंत्री, विविध पक्षांचे मातब्बर नेते, खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष वाराणसी आणि अमेठी या मतदारसंघातील निकालाकडे लागले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: