Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतीय हवाई दल-राफेल प्रकल्पाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn2
5पॅरिस, दि. 22 (वृत्तसंस्था) : फ्रान्समध्ये भारतीय हवाई दल- राफेल प्रकल्प व्यवस्थापनाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी केल्याचे समोर आले आहे. भारताने 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवाई दलासाठी राफेल विमानांच्या शस्त्रसज्जतेत महत्त्वाचे आणि आवश्यक बदल करण्यात येत आहेत. हे काम पाहण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी हवाई दलाचे पथक पॅरिसमध्ये आहे. त्या संदर्भातील दस्तऐवज चोरण्याचा उद्देश त्यामागे असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरात राफेल प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार्‍या पथकाचे कार्यालय असून कार्यालयातून हार्ड डिस्क किंवा कोणताही दस्तऐवज चोरीला गेलेला नाही, अशी माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली. अज्ञात व्यक्तींचा कार्यालयात घुसण्याचा नेमका उद्देश कोणता होता, याचा तपास सुरू आहे.
ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली राफेल प्रकल्प व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. 36 राफेल विमानांमध्ये भारतीय हवाई दलाला अनुकूल आणि आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यांच्या निर्मितीसाठी ठेवावा लागणारा समन्वय आणि विमानांचे उड्डाण, कार्यान्वयन यासाठी आणि विमानांच्या देखभाल, दुरुस्तीचे भारतीय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण या बाबी   हे कार्यालय हाताळत आहे. पॅरिसमधील सेंट क्लाउड उपनगरातील एका संकुलात हे कार्यालय आहे. राफेल विमानांची निर्मिती करणार्‍या दसॉ एव्हिएशन या कंपनीच्या कार्यालयाजवळच भारतीय अधिकार्‍यांचे कार्यालय असून  फ्रेंच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे. अशा कार्यालयात मोठी रोकड अथवा मौल्यवान वस्तू ठेवली जात नाही. त्यामुळे दस्तऐवज चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असल्याचा दाट संशय बळावला आहे. भारतीय हवाई दलाने या घटनेबाबत संरक्षण मंत्रालयाला सविस्तर माहिती दिली आहे.
भारतात राफेल विमानांच्या करारावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. या विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सत्तेवर आल्यास आम्ही राफेल खरेदी कराराची चौकशी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुरुंगात डांबू, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा वेळीच कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाल्याने आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताला पहिले राफेल विमान यावर्षी सप्टेंबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता त्या विमानांबरोबर सुखोई आणि ‘मिग-21‘ या विमानांची ‘डॉगफाईट झाली होती. त्यावेळी राफेल असते तर पाकिस्तानची भारतीय हवाई हद्द ओलांडण्याची हिम्मतच झाली नसती, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी म्हटले होते. त्याचबरोबर बालाकोट हवाई हल्ल्याच्या वेळी राफेल विमान आपल्या ताफ्यात असते तर निकाल वेगळा असता, असे पंतप्रधान आणि हवाई दल प्रमुखांनी म्हटले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: