Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माढ्यात राष्ट्रवादी हॅट्ट्रिक साधणार की कमळ फुलणार?
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि22 : लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत  2009 मध्ये अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघावर 2009 आणि 2014 मधील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याने या वेळीही या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयश्री खेचून आणणार, असा अंदाज बांधला जात असतानाच यावेळी राष्ट्रवादी नव्हे तर भाजपचा उमेदवारच विजयश्री मिळविणार असा निर्धार भाजप-सेना समर्थकांनी व्यक्त करून त्यादृष्टीने काम केल्याने उद्या याचा निकाल लागणार असून विजयश्री कोणाला मिळते हे गुरुवार दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
  2009 मध्ये शरद पवार विजयी
2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला हे 4 विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील माण व फलटण विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मतदारसंघातून त्यावेळी केेंद्रीय कृषिमंत्री असलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपने विद्यमान सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्याचवेळी या मतदारसंघात असलेल्या धनगर समाजाच्या प्राबल्याचा आणि आपल्या संपर्काचा विचार करून  विद्यमान पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री रासपचे महादेव जानकर यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात या मतदारसंघातून लोकमत आजमावले.
2014 च्या मोदी लाटेतही
राष्ट्रवादीच विजयी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदी लाट असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.
मात्र, त्यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कृतिशील नेतृत्व विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा पराभव करत मोदी लाटेतही विजयश्री खेचून आणून मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
 पुन्हा राष्ट्रवादी जिंकणार का?
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या अनेक मंडळींनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांचाही समावेश होता. त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असतानाच काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देवून काँग्रेसला रामराम ठोकत वेगळा विचार करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपने त्यांना या मतदारसंघातून
उमेदवारी दिली.
रणजितसिंहांना सर्वांचाच पाठिंबा
भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी मोहिते-पाटील यांची संपूर्ण ताकद उभी राहिली. त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघातही रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना अनेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या मतदारसंघाकडे मोर्चा वळवत रणजितसिंहांना पाठिंबा दिला. पंतप्रधानांची प्रचंड जाहीर सभा, मुख्यमंत्र्यांच्या 2/3 जाहीर सभा अन्य मंत्र्यांच्या आणि नेते व कार्यकर्त्यांच्या सभांमुळे हा मतदारसंघ अक्षरश: ढवळून निघाला.
शरद पवार, अजित पवारांसह सर्वांच्या सभा
राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यासाठी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, आ. अजित पवार, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर यांच्यासह या मतदारसंघातील आजी, माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अनेकांनी संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करून प्रचंड जाहीर सभा व मिरवणुकांद्वारे संपूर्ण मतदारसंघात वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या पार्श्‍वभूमीवर दोन्ही बाजूंकडून विजयाची ग्वाही दिली जात असून उद्या, दि. 23 रोजी जल्लोषाची मोठी तयारी करण्यात  येत आहे.
पोलीस दलाच्यावतीने सुरक्षेच्या उपाययोजना
दरम्यान, लोकसभा निवडणूक मतमोजणी व निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून पोलीस दलाचे पथ संचलन करण्यात आले. 10 जणांना एका दिवसासाठी शहरात वास्तव्याला बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक, रॅली व एकत्र जमण्यासही बंदी घालण्यात आल्याचे शहर  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.  शहरातील काही भागात बंदोबस्तासाठी ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात आले असून नाकाबंदी आणि तीन भागांमध्ये विभागणी करून वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय एखादा अनुचित प्रकार घडल्यास दंगा काबू नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात ठेवण्यात येणार आहे.  बंदोबस्तासाठी 4 अधिकारी, 33 पोलीस कर्मचारी, 25 गृहरक्षक दल जवान आणि दंगा काबू नियंत्रण पथक 20 कर्मचार्‍यांची तुकडी शहरात तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीनेही तालुक्यात बंदोबस्ताचे काय नियोजन केले आहे, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: