Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘व्हीव्हीपॅट’ मतपावत्यांची पडताळणी पूर्वीप्रमाणेच
ऐक्य समूह
Thursday, May 23, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
केंद्रीय निवडणूक आयोगाचा विरोधकांना झटका
5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी सुरू करण्यापूर्वी  ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमधील मतपावत्यांची पडताळणी करावी आणि त्यात तफावत आढळल्यास लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटमधील मतपावत्या पडताळून पहाव्यात, ही विरोधकांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी पूर्वीप्रमाणे मतमोजणीच्या शेवटीच करण्यात येईल, असे स्पष्ट करत आयोगाने विरोधकांना झटका दिला आहे.
विरोधकांनी काल निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ईव्हीएम संदर्भातील आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्याचबरोबर एक निवेदन देऊन व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मतमोजणी सुरू करण्यापूर्वी पडताळणी करावी, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर एखाद्या व्हीव्हीपॅटमधील मतपावत्या आणि त्याला जोडलेल्या ईव्हीएममधील मतदान यात तफावत आढळल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली होती. त्यावर आज बैठक घेऊन  आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने विरोधकांना झटका दिला. विरोधकांच्या मागणी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची आज मॅरेथॉन बैठक झाली. त्याला मुख्य निवडणूक आयुक्तांसह निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतमोजणीला 2 ते 3 दिवस विलंब होईल, असे आयोगाच्या अधिकार्‍यांचे मत बनले. त्यामुळे त्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी पूर्वीप्रदाणेच मतमोजणीच्या शेवटी होईल. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, तृणमूलसह 22 पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली होती.
पोस्टल मतपत्रिकांची ईव्हीएमबरोबर मोजणी
दरम्यान, यंदा पोस्टल मतपत्रिका मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याने ईव्हीएमसोबतच या मतपत्रिकांची मोजणी करायचा निर्णय आयोगाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी मतमोजणीला सुरुवात करताना सर्वप्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येत असे. मात्र, या निवडणुकीत सुरक्षा दलांमध्ये एकूण 18 लाख मतदार आहेत. त्यात सशस्त्र दले, केंद्रीय राखीव दले, राज्य पोलीस दले (ज्यातील कर्मचारी राज्याबाहेर निवडणूक बंदोबस्तासाठी नेमले जातात) यांच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यंदा त्यातील तब्बल 16 लाख 49 हजार कर्मचार्‍यांनी आपला मतदानाचा हक्क बजावाताना पोस्टल मतपत्रिका संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पाठवल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मतपत्रिका आल्याने त्यांची मोजणी ईव्हीएमबरोबरच करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: