Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना नदी पात्रामध्ये पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 21 : पाटणपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर कोयना नदीवरील नेरळे पुलाजवळ 22 वर्षीय युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. विजय विलास संकपाळ असे मृत युवकाचे नाव आहे. या युवकाला पाण्यात बुडत असताना अनेकांनी वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु पाण्याचा वेग व प्रवाह मोठा असल्याने त्यांना अपयश आले. या घटनेची फिर्याद त्याचे चुलते लक्ष्मण यशवंत सपकाळ यांनी पाटण पोलिसात दिली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, विजय विलास संकपाळ (वय 22, रा. झाकडे, किल्ले मोरगिरी, ता. पाटण) सध्या रा. मुंबई हा युवक आपल्या मूळगावी सुट्टीसाठी आला होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास चुलते व मित्रांसोबत कपडे धुण्यासाठी व पोहण्यासाठी तो कोयना नदीवर गेला होता. नदी पात्रामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नेरळे पुलानजीक असलेल्या पाटणला पाणी पुरवठा करणारे जलकेंद्राजवळील पाण्याच्या डोहामध्ये गेला व तो पाण्यामध्ये बुडू लागला. यावेळी त्या ठिकाणी असणारी त्याची बहीण आरडा ओरडा करु लागल्याने जवळचे पुलाजवळ आंघोळ करणार्‍या युवकांनी नदीच्या वरच्या बाजूला घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्या वेळी हा युवक पाण्यामध्ये खोल बुडालेला होता. तिथे उपस्थित असणारे विशाल शिर्के, दत्ता शिर्के, शंकर सुतार या युवकांनी थेट नदीमध्ये उडी मारुन युवकास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित युवकाच्या गळ्यामध्ये असणारी चेन चमकल्याने या युवकांनी त्या दिशेने जात संबंधित युवकाला पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर त्याला पाटण ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मृत  झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाचे चुलते लक्ष्मण यशवंत संकपाळ यांनी पाटण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सपोनि. यु. ए. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली खांडे तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
माझ्या दादाला वाचवा..माझ्या दादाला वाचवा...
सदर कुटुंब मुंबईला स्थायिक झाले आहे. सुट्टीनिमित्त झाकडे येथे गावी आले होते. आपल्या कुटुंबासोबत विजय हा पोहण्यासाठी नदीपात्रामध्ये गेला होता. आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा पाण्यामध्ये बुडत होता. परंतु कुटुंबातील कोणालाही पोहता येत नसल्याने कोणीही काहीही करु शकले नाही. संबंधित युवक हा आई, वडिलांना एकुलता एक होता. आपला भाऊ बुडत असलेला पाहून त्याच्या बहिणीने केलेला आरडा ओरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. बहीण जोरजोरात, दादाला वाचवा, माझ्या दादाला वाचवा... म्हणत होती परंतु, तिच्या हाकेला दादाने काय साद दिली नाही.. कुटुंबातील व्यक्तींची अवस्था पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: