Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शंभर टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची पडताळणी करा
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: na1
भयगंडाने पछाडलेल्या विरोधकांची मागणी
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : एक्झिट पोलमधील निष्कर्षांमुळे लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या भयगंडाने पछाडलेल्या काँग्रेस, सप, बसप, तृणमूलसह 22 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. लोकसभा मतदारसंघांतर्गत एखाद्या विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या पाच ‘व्हीव्हीपॅट’मधील मतपावत्यांच्या पडताळणीत ईव्हीएममधील मतांशी तफावत आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील शंभर टक्के व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली.
मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मतमोजणी सुरू करण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने निवडलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. त्यावर निवडणूक आयोग उद्या (बुधवार) बैठक घेणार असल्याचे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
दरम्यान, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे सांगताना ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचे विरोधी पक्षांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये स्ट्राँगरूममधील ईव्हीएम बदलण्यात येत असून त्यांची वाहतूक होत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. या व्हिडिओंमध्ये दावा केलेली ईव्हीएम ही मतदानासाठी वापरलेली नसून ती राखीव होती. या प्रकरणी करण्यात येत असलेले आरोप निखालस खोटे आणि निराधार आहेत. मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे उमेदवार, त्यांचे मतदान प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांसमोर सील करण्यात आली आहेत. ही मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.
स्ट्राँगरूमला दोन कुलपे लावून ती सील करण्यात आली आहेत. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.
व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांच्या पडताळणी संदर्भात 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज निवडणूक आयुक्त आणि आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन एक निवेदन दिले. 23 मे रोजी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघातल्या कुठल्याही पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटशी ईव्हीएमची पडताळणी करा. यात कुठेही ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे आढळल्यास त्या मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅट मशीनमधील मतपावत्या ईव्हीएममधील मतांशी पडताळून पाहा, अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अभिषेक सिंघवी, अशोक गेहलोत, अहमद पटेल, तेलगू देसमचे नेते व आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजदचे मनोझ झा, सपचे रामगोपाल यादव, माकपचे सीताराम येचुरी, टी. के. रंगराजन, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, माजीद मेमन, द्रमुकच्या के. कनिमोळी, भाकपचे सुधाकर रेड्डी, डी. राजा, लोजदचे जावेद रझवा, नॅशनल कॉन्फरन्सचे देवेंद्र राणा, जनता दल (धर्मजनिरपेक्ष) कुपेंद्र रेड्डी आदी नेते उपस्थित होते.
याचिका फेटाळली
दरम्यान, लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएममधील मतांशी सर्व व्हीव्हीपॅट मशीनमधील मतपावत्यांची पडताळणी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तंत्रज्ञांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली होती. सर्व ईव्हीएममधील मतांशी व्हीव्हीपॅटची जोडणी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ही मागणी गुणवत्तेच्या कसोटीवर टिकत नसल्याचे सांगून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: