Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रालोआच्या नेत्यांचे ‘हम साथ साथ है’
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: na2
मोदी-शहांची ‘डिनर डिप्लोमसी’
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : एक्झिट पोलचे निष्कर्ष मनासारखे आल्याने उत्साह संचारलेल्या रालोआतील नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाही भोजन दिले. दिल्लीतील पंचतारांकित अशोका हॉटेलमध्ये मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांचा भाजपने अगत्याने पाहुणचार केला.
‘फिर एक बार मोदी सरकार’ येणार असल्याचे निष्कर्ष एक्झिट पोलने वर्तविल्याने रालोआच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वच नेत्यांच्या चेहेर्‍यावर त्याची झाक स्पष्ट दिसत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बसण्याची व्यवस्था अमित शहा यांच्या शेजारी करण्यात आली होती.
सर्वच ‘एक्झिट पोल’नुसार रालोआचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मतमोजणीच्या दोन दिवस आधी सर्व मित्रपक्षांना भाजपने स्नेहभोजन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होतेच, त्याचबरोबर सर्व नेत्यांचे आदरातिथ्य करत होते. 23 मे ला काय निकाल लागतील, याची धाकधूक असली तरी काय होणार, याची दिशा सर्वांनाच कळाली आहे.
2014 ला भाजपला बहुमताएवढ्या 282 जागा स्वबळावर मिळाल्याने भाजपचे नेते आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रालोआतील मित्रपक्षांना तुच्छतेची वागणूक देत होते, अशी टीका करण्यात येते. भाजपने स्नेहभोजन देऊन या टीकेला उत्तर देत आपली प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न  केला. बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास कुंपणावरच्या पक्षांना योग्य संदेश जावा, असाही भाजपचा प्रयत्न आहे. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई स्नेहभोजनाला उपस्थित होते. अकाली दलाच्या हरसिमरन कौर, बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह रालोआमधील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: