Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अरुणाचलमध्ये दहशतवादी हल्ल्यात आमदारासह दहा ठार
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: na2
5इटानगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो (41) यांच्यासह दहा जणांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अबो यांचा वाहनांचा ताफा आज सकाळी 11.30 च्या सुमारास जात असताना बोगापानी गावाजवळ गाड्या अडवून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात अबो, त्यांचा मुलगा आणि सुरक्षारक्षक असे एकूण दहा जण ठार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिरोंग अबो हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा एकदा खोनसा पश्‍चिम मतदारसंघातून एनपीपीकडून नशीब आजमावत होते. अरुणाचलमध्ये लोकसभेसोबत विधानसभेचेही मतदान झाले असून निकालाआधीच अबो यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अबो हे मतदारसंघात परतत होते. त्यांच्यासोबत कुटुंबीय, पोलिंग एजंट व तीन पोलीस होते. या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना दिब्रुगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही घटना धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी व्यापक कारवाई हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एनपीपीचे अध्यक्ष व मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड के. संगमा यांनीही या घटनेचा निषेध करत पंतप्रधान कार्यालय व गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: