Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
ऐक्य समूह
Wednesday, May 22, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: mn3
मतपडताळणीमुळे निकालास लागणार विलंब, भिवंडीत सर्वाधिक 35, हातकणंगलेत 17 फेर्‍या
5मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून त्यासाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांसह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून दहा वाजेपर्यंत कल स्पष्ट होतील, असा अंदाज आहे. असे असले तरी यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघातील 30 मतदान यंत्रांसोबत जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’मधील मतपावत्यांची प्रत्यक्ष मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागणार आहे.
देशभराबरोबरच राज्यातील लोकसभेच्या 48 जागांची मतमोजणी गुरुवारी होत असून यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी आज या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण व त्याबाबतच्या नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. फेरी पद्धतीने मतमोजणी होणार असून फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा केली जाणार आहे. पालघर आणि भिवंडीमध्ये मतमोजणीच्या सर्वाधिक 35 फेर्‍या होणार असून सर्वात कमी 17 फेर्‍या हातकणंगले मतदारसंघात होतील.
भंडारा-गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात मतमोजणीच्या 33 फेर्‍या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 फेर्‍या होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात मतमोजणीच्या 18 फेर्‍या होणार आहेत. राज्यात 48 लोकसभा मतदारसंघांसाठी 97 हजार 640 मतदान केंद्रांवर मतदान झाले असून 867 उमेदवार रिंगणात आहेत.
‘व्हीव्हीपॅट’ मोजणीसाठी वेळ लागणार
मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा आणि प्रत्यक्ष मतपत्रिका यावरील बारकोड स्कॅन करून मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ‘ईटीपीबीएस’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.     
त्यानंतर मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी सुरू होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त करताना व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के मतपावत्यांची मोजणी करण्यात यावी यासाठी 23 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान पाच व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 30 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मतपावत्यांची पडताळणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागणार आहे. व्हीव्हीपॅटमधील मतांच्या मोजणीसाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. व्हीव्हीपॅटमधील मतपावत्या आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवली गेलेली मते जुळतात की नाही, याची खातरजमा केली जाईल. त्यात तफावत असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतांची संख्या ग्राह्य धरली
जाणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: