Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंगल कार्यालयांमध्ये चोरी करणार्‍या चोरट्यास अटक
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: lo3
2 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत
 5सातारा, दि. 20 : सातारा तालुका हद्दीमध्ये असणार्‍या विविध मंगल कार्यालयांमधून मोबाईलसह किमती ऐवज चोरणार्‍या एका चोरट्यास सातारा तालुका पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 2 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गेल्या काही दिवसांमध्ये सातारा तालुका हद्दीमध्ये असणार्‍या मंगल कार्यालयांमधून मोबाईलसह किमती ऐवजाच्या चोरीच्या घटना घडत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा तालुका पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी डीबी पथकास    संबंधित चोरट्याचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे पथकातील पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांनी चोरट्याची माहिती प्राप्त करून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले असता दि. 18 मे रोजी संग्राम उर्फ बंटी नंदकिशोर गायकवाड (वय 20), मूळ रा. मंगळवार पेठ, लाड चौक, कोल्हापूर याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सातारा तालुक्याच्या हद्दीमधील विविध मंगल कार्यालयामधून महागडे मोबाईल, किमती ऐवज चोरी करण्यासाठी एका ठिकाणाहून लॅपटॉपची चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी संशयितांकडून आयफोन, ओपो एम. आय. कंपनीचे 10 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 नथ व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. तालुक्यातील ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले असतील त्यांनी सातारा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: