Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा भूविकास बँकेची इमारत अखेर जमीनदोस्त
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 20 : सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणारी, जिल्ह्याची तत्कालीन लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी सातार्‍यातील भू-विकास बँकेची इमारतही आज जमीनदोस्त झाली. गेली पाच दशके भू-विकास बँक चौक म्हणून ओळखली जाणारी चौकाची निशाणीही सातार्‍याच्या इतिहासातून आज पुसून टाकण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, एकेकाळी राज्यभरात शेतकर्‍यांची तारणहार म्हणून ओळखल्या जाणार्‍या भू-विकास बँकांना सुमारे 15 वर्षांपूर्वीच घरघर लागली होती. 2000 साली सत्तेवर आलेल्या तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या भू-विकास बँकेला सापत्नभावाची वागणूक दिली होती. त्यामुळे या बँकेचे पुनरुजीवित होण्याची  शक्यता जवळजवळ संपुष्टात आली होती. राज्यातील अनेक सहकार महर्षींना स्वत:च्या आर्थिक संस्था शाबूत ठेवण्यासाठी राज्य भू-विकास बँक अवसायनात काढण्याची घाई झाली होती. गेल्या 15 वर्षांच्या कार्यकालामध्ये राज्य सरकारने भू-विकास बँकांचे पुनरुजीवन करण्यासाठी अर्थसंकल्पात भू-विकास बँक संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यभरातील भू-विकास बँका अवसायनात निघाल्या. राज्यभरातील या बँकांमधील हजारो कर्मचारी देशोधडीला लागले. सातार्‍यातही गेल्या अनेक वर्षापासून या बँकेचे कामकाज ठप्प होते. सातारच्या लौकिकात भर घालणारी ही जुनी देखणी इमारत अखेरच्या घटका मोजत होती. अखेर लिलावात निघालेली ही इमारत सातारच्या काही बिल्डरांनी विकत घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरु आहे. जेसीबी आणि पोकलॅनच्या सहाय्याने ही इमारत उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. मात्र, ज्या बँकेने गेल्या पाच दशकांमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावून स्थैर्य प्राप्त करुन दिले, त्याच बँकेची इमारत जमीनदोस्त होताना पाहून अनेकांच्या काळजात चर्रर्र झाले. मात्र पर्याय नाही, असे म्हणतही अनेकांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: