Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निकालाआधी विरोधकांच्या हालचाली
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान संपले असून सर्वच एक्झिट पोल्सनी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक प्रादेशिक पक्षांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करणे टाळले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मात्र सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे.
एक्झिट पोल्समध्ये आणि निकालांमध्ये जमीन-आसमानाचा फरक असेल, असा दावा चंद्राबाबू नायडू यांनी  केला आहे. यावर्षी विरोधी पक्षांचीच आघाडी सत्तेत येईल, असा विश्‍वास चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडूंनी गेल्या काही दिवसांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लवकरच ते निकालानंतरच्या समीकरणांबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
दुसरीकडे एक्झिट पोल्सचे अंदाज थोडे जरी चुकले तरी भाजपला सत्तेपासून दूर कसे राखता येईल याचा डाव शरद पवार आखत आहेत. ओडिशातील बीजेडी आणि आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांनी अजूनही आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. भाजपनेही या पक्षांचा निवडणुकांदरम्यान जास्त विरोध केलेला नाही. उलट मोदींनीच फनी वादळादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी शरद पवार संपर्कात आहेत. नवीन पटनाईक आणि जगनमोहनला सोबत घेण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. सगळे विरोधी पक्षनेते एकत्र आल्यास भाजपला शह देता येईल असा विश्‍वास या दोन्ही नेत्यांना वाटतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्व पक्षश्रेष्ठींची एक बैठक बोलावली आहे. निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर या बैठकीत विचारमंथन होणार आहे. दि. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे यावर्षी कोण सत्तेत येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: