Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चोरे येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re1
पोलीस पकडण्यास गेले असता पतीची विहिरीत उडी
5उंब्रज, दि.20: चोरे, ता.कराड येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून निर्दयीपणे खून केल्याची घटना सोमवारी दुपारी 3.45 सुमारास घडली. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान, संशयितास पोलीस पकडण्यासाठी गेल्यानंतर त्याने विहिरीत उडी घेतल्याने तो जखमी झाला आहे. 
सौ.शशिकला आनंदा सातपुते (वय 45, रा. बेघरवस्ती, चोरे, ता. कराड) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आनंदा दादू सातपुते
(वय 50) असे खून करणार्‍या संशयिताचे नाव आहे. या घटनेने चोरे परिसरात खळबळ उडाली असून संशयित पतीला उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत उंब्रज पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की चोरे येथील मुख्य रस्त्यालगत बेघरवस्ती असून मागासवर्गीय समाजाची ही वस्ती आहे. येथे सातपुते कुटुंब राहत असून पती, पत्नी व दोन मुले वास्तव्यास आहेत. यातील संशयित आनंदा सातपुते यास दारूचे व्यसन असल्याने आनंदा सातपुते व पत्नी शशिकला यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. मावस बहिणीचे लग्न असल्याने दोन्ही मुले पंधरा दिवसांपूर्वी चोरे येथे आली आहेत. दारूच्या पैशावरून पत्नी शशिकला यांच्यासह आनंदा सातपुते हा मुलांनाही शिवीगाळ, दमदाटी करत होता. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास संशयिताने दारू पिऊन घरी मुलगा व पत्नीसोबत भांडण केल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. त्यानंतर मुलगा आकाश हा लग्न साहित्य खरेदीसाठी उंब्रज येथे आला होता. त्यादरम्यान शशिकला सातपुते या घरातील हॉलमध्ये दुपारी झोपल्या असताना आनंदा सातपुते याने दारूच्या नशेत पत्नी शशिकला यांच्या मानेवर व डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यामध्ये शशिकला यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीस ठार करून पती आनंदा याने दरवाजाला आतून कडी लावून पलायन केले. त्यास ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उसामध्ये पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस चोरे येथे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. त्यास पकडत असताना त्याने विहिरीत उडी घेतल्याने संशयित आनंदा सातपुते जखमी झाला. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजय गोरड यांनी पहाणी करून पंचनामा केला आहे. याबाबत फिर्याद आकाश आनंदा सातपुते याने दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: