Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा, कोरेगाव तालुक्यात वाळू माफिया ‘सैराट’
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:33 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 20 : वाळू उत्खननाचे लिलाव झाले नसतानाही सातारा, कोरेगाव तालुक्यामधील नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खननाचा सुळसुळाट सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून वाळू माफिया सैराट झाले असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाल्याचे पाहायला मिळत नसल्याने या दोन्ही तालुक्यातील तलाठी आणि सर्कल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
महसूल विभागाने अद्याप जिल्ह्यात वाळूचे लिलाव काढले नाहीत. तरीही सातारा तालुक्यातील पाटखळ, माहुली, सोनगाव, महागाव, जैतापूर, तासगाव, कामेरी आणि कोरेगाव तालुक्यातील धामणेर, जिहे, कठापूर, ब्रह्मपुरी, नेरवाडी, तारगाव, नांदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याच्या चर्चा आहेत. 9 हजार रुपये प्रति ट्रॉलीने वाळूची विक्री करून वाळू माफिया महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावत असतानाही तलाठी, सर्कल, महसूल विभागातील अधिकार्‍यांकडून कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. उलट लोकसभा निवडणुकांच्या काळात पोलिसांनीच अवैध वाळू वाहतूक  करणार्‍या चालकांवर कारवाई केल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटखळ, ता. सातारा येथील एका चालकाने आपल्या वाहनावर ऑन ड्युटी इलेक्शन असा स्टीकर लावून वाळूची चोरटी वाहतूक करत असताना कर्तव्य बजावत असणार्‍या पोलिसांनी संशयावरून ते वाहन ताब्यात घेतले होते. या वाहन चालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले होते. दि. 17 रोजी वाळूची बेकायदेशीर वाहतूक करताना घडवले त्या कारणावरून एका पोलिसाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व पैशाचे पाकीट जबरदस्तीने चोरणार्‍या सातार्‍यातील दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. थोडक्यात अवैध वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी पोलीस सज्ज झाले असताना दुसरीकडे मात्र महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आज सातारा आणि कोरेगाव या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरकुलांच्या कामासह अन्य बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना कोण वाळूचा पुरवठा करतो? हा पुरवठा अधिकृत आहे का? बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या माफियांना कोण पाठीशी घालत आहे. त्यांचा खरा सूत्रधार कोण आहे? या सर्व बाबींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास महसूल विभागाला फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
महसूल विभागातील अधिकारी मॅनेज?
दोन वर्षांपूर्वी सातारा तालुक्यात चोरटी वाळू वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने तहसीलदार, प्रांत यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पथके तयार केली होती. या पथकांनी कारवाईचा धडाका लावला होता. विशेषत: आनेवाडी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली होती. सन 2019 मध्ये विशेष कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. नवीन वर्ष सुरू होऊन 5 महिने झाले तरी महसूल विभागाच्या कामगिरीत फार काही फरक न पडल्याने या विभागातील अधिकारी मॅनेज झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: