Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सरासरी 63.43 टक्के मतदान
ऐक्य समूह
Monday, May 13, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: mn1
हिंसाचारानंतर प. बंगालमध्ये विक्रमी मतदान
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान संपले आहे. 7 राज्यांत 8 पर्यंत 63.43 टक्के मतदान झाले. तर हिंसाचारानंतर पश्‍चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले. सहाव्या टप्प्यात 7 राज्यात 59 जागांवर मतदान झाले. यात प. बंगालमध्ये 80.16 टक्के, दिल्लीत 56.11 टक्के, हरियाणामध्ये 62.91 टक्के, उत्तर प्रदेशात 53.37 टक्के, बिहारमध्ये 59.29 टक्के, झारखंडमध्ये 64.46 तर मध्य प्रदेशात 60.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
बंगालमध्ये हिंसाचार
पश्‍चिम बंगालमधील घाटलच्या भाजप उमेदवार भारती घोष यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचे पक्ष कार्यकर्ते असल्याचा आरोप पश्‍चिम बंगाल भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. तर शनिवारी झारग्राममध्ये भाजपचे बूथ कार्यकर्ता रमण सिंह यांची हत्या करण्यात आली. रमण सिंह गोपीबल्लभपूर येथील भाजपचे बूथ कार्यकर्ता होते. टीएमसी कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान पश्‍चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावरही हल्ला हा तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप दिलीप घोष यांनी केला आहे. पराभवाच्या भीतीने तृणमूल असे करत असल्याचा आरोपही घोष यांनी केला आहे. इथल्या बांकुरामधील मतदान केंद्रावर तृणमूल काँग्रेसने गडबड केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
दिग्गजांचे मतदान
अनेक दिग्गजांनी सकाळी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रांगेत उभे रहात मतदानाचा हक्क बजावला. तसेच नवी दिल्लीतल्या औरंगजेब लेन येथील सीनिअर सेकंडरी स्कूलमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही  मतदान केले. भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याशी लढत आहे. मतदानापूर्वी प्रज्ञासिंह यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. भाजप उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. पूर्व दिल्लीतल्या कृष्णा नगरमधल्या रतन देवी आर्य गर्ल्स स्कूलमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले. दिल्लीतल्या सातही जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.
माकप नेते सीताराम येच्युरी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही मतदान केले. गुरुग्राम इथल्या मतदान केंद्रावर कोहली पोहोचला. सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी असल्याने बराच वेळ कोहली रांगेत उभा होता. यावेळी कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्याशी संवाद साधला. यानंतर कोहलीने आपला मतदानाचा हक्क बजावला.
माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार गौतम गंभीरनेही दिल्लीतल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गंभीरसह त्याच्या पत्नीनेही मतदान केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: