Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मांडूळाची तस्करी करणार्‍या दोघांना मालखेडमध्ये अटक
ऐक्य समूह
Monday, May 13, 2019 AT 11:39 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 12 ः मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत मांडुळाची तस्करी करणार्‍या दोघांना कराड तालुका पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केली. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी मांडूळ तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या परिसरात दोघे जण मांडूळ सापाची तस्करी करणार असल्याची बातमी पोलिसांना समजली. बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व हवालदार म्हेत्रे यांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे हे डिस्कवर गाडीवरून तेथे आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी उघडून पाहता त्यामध्ये एक डबा होता. त्याचे झाकण उघडून पाहिले असता त्यामध्ये एक काळपट रंगाचे सुमारे तीस लाख रूपये किमतीचे 64 सेमी लांबीचा व 8 सेमी जाडीचा मांडूळ जातीचा साप विक्री करण्याकरिता आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता लोक धनदौलत वाढावी या अंधश्रद्धेपोटी मोठ्या किमतीला    
 मांडूळ खरेदी करतात, असे त्या दोघांनी सांगितले. सदर प्रकरणी पोलिसांनी पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस उपविभागीय नवनाथ ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, हवालदार म्हेत्रे यांनी केली. डांगे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: