Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अजोय मेहता राज्याचे नवे मुख्य सचिव प्रवीण परदेशी मुंबई महापालिकेचे आयुक्त
ऐक्य समूह
Saturday, May 11, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : दुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल केल्यानंतर राज्याच्या प्रशासनात फेरफार करण्याला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने राज्य सरकारने आज मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली तर मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी पाठवण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत मेहता हे पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी सरकारने राज्याच्या प्रशासनात बदल करण्याचा निर्णय घेतला. विद्यमान मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी कार्यकाळ संपण्याअगोदरच सेवानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागी कोणाला नेमायचे, याचा शोध सुरू झाला. सेवाज्येष्ठतेमध्ये 1984 च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले अजोय मेहता, संजयकुमार व सतीश गवई यांची नावे पुढे आली; परंतु राज्यातील आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी  सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गुरुवारी पत्र पाठवले होते. या पत्राला आयोगाने तत्काळ मंजुरी देतानाच मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार मदान यांच्या जागी मेहता यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातील अधिकारी समजले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रखडलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असून महत्त्वाच्या पदांवर फेरबदल होण्याची शक्यता आहे.
विद्यमान मुख्य सचिव मदान यांनी 23 मार्च 2019 रोजी मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला होता. ऑक्टोबर 2019 मध्ये ते निवृत्त होणार होते; परंतु तत्पूर्वीच त्यांनी सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला. मदान यांनी सेवानिवृत्ती घेतली असली तरी त्यांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नेमण्यात येणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून पाठविण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: