Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चाफळमधील खून प्रकरणी चंद्रकांत भाईगडेस आजन्म कारावासाची शिक्षा
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re5
5चाफळ, दि. 9 : तू आठवडा बाजारात तुझी जीप घेवून कशासाठी येतोस, त्याचा लोकांना त्रास होतो असे म्हणून चिडून चंद्रकांत महादेव भाईगडे याने स्वत:च्या जीपमधील डबलबार बंदुकीने दि. 25 ऑगस्ट 2016 रोजी चाफळ बसस्थानकासमोर विकास बबन साळुंखे (वय 40, रा. भांबेवाडी, चाफळ) याच्यावर दोन राऊंड फायर करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी उंब्रज पोलिसांनी आरोपी चंद्रकांत भाईगडे विरोधात कराड येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होवून कराडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. एच. केळूसकर यांनी आरोपी चंद्रकांत भाईगडे याला दोषी धरून आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, जाधववाडी (चाफळ) येथील रहिवाशी आरोपी चंद्रकांत महादेव भाईगडे याने दि. 25 ऑगस्ट 2016 रोजी चाफळ बसस्थानकासमोर विकास बबन साळुंखे (वय 40, रा. भांबेवाडी, चाफळ) याला तू आठवडा बाजारात तुझी जीप घेवून कशासाठी येतोस. त्याचा लोकांना त्रास होतो असे म्हणून चिडून स्वत:च्या जीपमधील डबलबार बंदुकीने विकास साळुंखेच्या पाठीत दोन राऊंड फायर करून त्याचा खून केला होता व समोरील लोकांना बंदूक फिरवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून उंब्रज पोलीस ठाण्यात भादंविसं कलम 302, 506 व आर्म अ‍ॅक्ट 27, 30 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि के. जी. घाडगे यांनी करून आरोपी विरूध्द कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदर खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळूसकर यांच्या न्यायालयात चालला व त्याकामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विजय आबासाहेब पाटील यांनी 24 साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी सुधीर सुरेश साळुंखे, प्रत्यक्ष दर्शी बाळासाहेब बाबूराव सावंत, रणजित माने, मारूती गंगाराम साळुंखे, ऋषिकेश साळुंखे, दिलीप बोर्गे, बाळकृष्ण जाधव या प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपीस बंदुकीसह मिठी मारणारे मारूती गंगाराम साळुंखे यांचीही साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच सदर कामातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत गोविंद दाभोळे यांनी मयतास फायर आर्मने मरण आल्याचे नोंदविले याकामी महत्त्वपूर्ण ठरले. सदर खटल्यात फिर्यादीतर्फे अति. सरकारी वकील अ‍ॅड. विजय पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी चंद्रकांत भाईगडे यास दोषी धरून आयपीसी कलम 302 आरोपाखाली आजन्म कारावास व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावास तसेच आयपीसी कलम 506 खाली दोषी धरून सहा महिने कारावास व 1 हजार रुपये दंड व तो न भरल्यास एक महिना कारावास आणि आर्म कायदा कलम 27 खाली दोषी धरून पाच वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सदर शिक्षा एकत्रित भोगण्याच्या आहेत. या खटल्याच्या कामी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विजय आबासाहेब पाटील यांना त्यांचे सहकारी सरकारी वकील अ‍ॅड. एम. व्ही. कुलकर्णी, अ‍ॅड. आर. सी. शहा, कार्यालयीन कर्मचारी आर. बी. पवार, पी. एस. भोसले व पोलीस अधिकारी एएसआय एच. एच. देशमुख, डी. बी. कोळी, पोलीस हवालदार ए. के. मदने, के. एम. चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल जी. जी. माने यांनी सहकार्य केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: