Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात पारंपरिक शिवजयंती उत्साहात
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 6 : कराड, महाबळेश्‍वरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरी होत आहे. यावर्षी नकट्या रावळ्याच्या पुरातन विहिरीत केलेली शिवछत्रपतींच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना ही या उत्सवाला आगळेवेगळे आयाम देणारी ठरली आहे. महाबळेश्‍वरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली.
कराडच्या सोमवार पेठेत पंतांचा कोट आहे. हा कोट म्हणजे इतिहासातील भुईकोट किल्ला आहे; परंतु काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आघातामुळे आता या किल्ल्याचे अवशेष राहिले आहेत. या किल्ल्याच्या परिसरात पौराणिक काळापासूनची विहीर आहे. ही विहीर नकट्या रावळ्याची म्हणून प्रसिद्ध आहे. या विहिरीची बांधणी संपूर्ण काळ्या दगडाच्या चिर्‍यांमधे केली आहे. विहिरीची बांधणी कलात्मक आहे. ही विहीर तीन मजली आहे. जागोजागी खोबण्यांमध्ये लाकडी तुळईचा वापर केला आहे.      
इथे अत्यंत आखीव रेखीव कमानी कोरण्यात आल्या आहेत.
नकट्या रावळ्या हा राक्षस होता. विहिरीत पाणी भरण्यासाठी आलेल्या लोकांना तो कैद करत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. तो रात्रीच्या वेळी येतो आणि लोकांना त्रास देतो, म्हणून प्रत्येक घरावर पांढर्‍या फुल्या मारण्याची अंधश्रद्धा अगदी गेल्या शतकापर्यंत होती.भारतीय पुरातत्त्व खात्याने या विहिरीचा समावेश संरक्षित यादीत आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांच्या यादीत केला आहे. ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटक व पुरातत्त्व अभ्यासक आवर्जून भेट देतात.
या ऐतिहासिक वास्तूने आज अनोखा सोहळा अनुभवला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कोटातील भवानी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाने शिवरायांच्या प्रतिमेची विहिरीतील कमानीत प्रतिष्ठापना केली. भगव्या पताका व झेंडे उभे केल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी भव्य मंडप उभे करून आज शिवप्रतिमेची स्थापना केली. यामध्ये चावडी चौकातील हिंदू एकता आंदोलन, शिवाजी क्रीडा मंडळ, भगवा रक्षक ग्रुप, श्रीकृष्ण गजानन मंडळ, बालगणेश मंडळ, नरसिंह गणेश व दुर्गा उत्सव मंडळ, श्री शिवाजी गणेश क्रीडा मंडळ, साईदत्त मंडळ आदींचा समावेश आहे. सायंकाळी दत्त चौकातील छ. शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याजवळ जन्मकाळाचा पाळणा झाला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेविका सौ. विद्या पावसकर, महिला व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
महाबळेश्‍वरमध्येही शिवजयंती उत्साहात
महाबळेश्‍वर : ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात, ढोल ताशे यांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेची शहरातून निघालेली शाही मिरवणूक आणि दिवसभरात तालुक्याच्या विविध भागातून आणलेल्या शिवज्योतीसह निघालेल्या भव्य मिरवणुका यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते. या वर्षी महाबळेश्‍वरातील शिवप्रेमींनी किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली. नाट्य शिव प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या पूर्वरात्री ‘रणझुंझार’ हे शिवराय व छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमावर आधारित सुमारे 250 स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ऐतिहासिक नाटक हे या वर्षीच्या शिवजयंती उत्सवाचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल.
महाराष्ट्रात सध्या तीन वेळा शिवजयंती साजरी होता असताना पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी ती साजरी केली जाते. याही वर्षी जल्लोषात शाही थाटात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाबळेश्‍वर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने या सोहळ्याचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी चौक व नेताजी सुभाषचंद्र चौकात भगव्या झेंड्याचे आरोहण समितीचे अध्यक्ष सचिन पवार व सचिन गुजर यांच्या हस्ते झाले. पालिकेतही छत्रपतींच्या पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले. छत्रपती शिवाजी चौकात रुद्राभिषेक करण्यात आला. कोळी आळीत महिलांच्या सहभागाने शिवरायांचा जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी पाळणा म्हणण्यात आला.
भगवे झेंडे, पताका आणि शिवरायांच्या बालपणापासूनचा जीवनपट व इतिहास दर्शविणारे फलक, यामुळे सारी नगरी सजून गेली होती. पोवाड्यांमुळे वातावरण शिवमय झाले होते. सायंकाळी जन्नीमाता मंदिरापासून शिवरायांच्या प्रतिमेची सजवलेल्या भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ सचिन पवार, नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, नितीन परदेशी, सचिन गुजर, शुभम कुंभारदरे, राहुल शेलार यांच्या हस्ते झाला. उत्सव समितीचे पदाधिकारी अनंत भिसे, रामदास जाधव, अरुण शिंगरे, किसन खामकर, नगरसेविका सौ. विमल ओंबळे, रवींद्र कुंभारदरे, युसूफ शेख, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी, उपनिरीक्षक ना. भा. गायकवाड, महाबळेश्‍वर अर्बन बँकेचे संचालक दिलीप रिंगे, राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, चंद्रकांत पांचाळ, बाळासाहेब कदम, नाना साळुंखे, सूर्यकांत पांचाळ, गोविंद कदम, रमेश शिंदे, सुनील यादव, आकाश साळुंखे, राकेश भोसले, गणेश जाधव, ओंकार नाविलकर, गणेश दगडे, मनोहर शिंगरे आदी उपस्थित होते.
शाही मिरवणूक तीन ते चार तास सुरू होती. फटाक्यांची आतषबाजी, पुणे, ताथवडे, नायगाव येथील ढोल-लेझीम व झांज पथके, भगवे झेंडे, कमानी यामुळे नगरी भगवीमय झाली होती. छत्रपती शिवाजी चौकात रात्री महाआरतीने उत्सवाची सांगता झाली. सोहळा मंगलमय वातावरणात शांततेत झाला. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. परिसरातील विविध गावांमधून शिवज्योती व मिरवणुकीचे आगमन होत होते. त्यांचे स्वागत महाबळेश्‍वर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले. शिवजयंतीच्या आदल्या रात्री शिवजयंती उत्सव समिती, नाट्य शिव प्रतिष्ठान व नाट्य परिषद शाखा यांच्यावतीने स्थानिक 250 कलाकारांनी ‘रणझुंझार’ हे छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटक सुबकपणे सादर केले. नाटकाचे संयोजन नाट्य शिव प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष किसान खामकर व अरुण शिंगरे यांनी केले. आज दुपारी दुचाकी रॅली काढण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: