Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: mn2
निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारची मागणी मान्य
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ असल्याने दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे, कामांच्या निविदा मागवणे, त्या अंतिम करून कार्यादेश काढण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून या संदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळवले असून मंत्र्यांनाही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करता येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर अधिकारी, कर्मचार्‍यांना मंत्र्यांच्या दौर्‍यात सहभागी होता येणार आहे. आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशही देता येतील.
दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कूपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल, दुरुस्ती, ही कामे तातडीने करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागवण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे, त्या संदर्भातील इतर प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: